राज्यात पोलिसांसाठी २० हजार घरे

By admin | Published: April 22, 2016 03:42 AM2016-04-22T03:42:10+5:302016-04-22T03:42:10+5:30

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ या वर्षात पोलिसांसाठी राज्यात १५ ते २० हजार घरे बांधण्याचे काम सुरू करणार आहे

20 thousand houses for the state police | राज्यात पोलिसांसाठी २० हजार घरे

राज्यात पोलिसांसाठी २० हजार घरे

Next

डिप्पी वांकाणी,  मुंबई
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ या वर्षात पोलिसांसाठी राज्यात १५ ते २० हजार घरे बांधण्याचे काम सुरू करणार आहे. त्यासाठी चालू आर्थिक वर्षात १५०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.
पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ या योजनेसाठी ६०० कोटी रुपये खर्च करणार आहे. ही रक्कम तीन महिन्यांत उपलब्ध होईल. तर ९०० कोटी रुपयांचे कर्ज हुडकोकडून घेण्यात येणार आहे. दरम्यान, डी.बी. रिअ‍ॅलिटी ही कंपनी मालाड पूर्व भागात पोलिसांसाठी ३ हजार क्वार्टर्स (निवासस्थाने) बांधणार आहे. या भागात सरकार जमीन उपलब्ध करून देणार आहे. सूत्रांनी सांगितले की, या महामंडळाने मागील दोन वर्षांत फक्त १०० कोटी रुपये खर्च केले आहेत. पण, चालू आर्थिक वर्षात यापेक्षा पंधरा पट अधिक रक्कम खर्च केली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश माथूर यांनी सांगितले की, ३ हजार निवासस्थानांचे बांधकाम आगामी तीन महिन्यांत सुरू होईल. त्यासाठी ठेकेदाराला ५०० ते ६०० कोटी रुपये दिले जातील. तर हुडकोकडून (हाउसिंग अ‍ॅण्ड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) चालू आर्थिक वर्षात दोन टप्प्यांत ९०० कोटी रुपये उभे केले जातील. एकूण १५ ते २० हजार घरे बांधण्याचे हे काम असल्याचेही ते म्हणाले.
वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गत दोन वर्षांत महामंडळ अधिक निधी खर्च करू शकले नाही. त्यामुळे या योजनेला गती देण्यासाठी सरकारने प्रशासकीय अधिकार राखून ठेवले आहेत. त्यामुळेच आता या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येणार आहे. यासंदर्भात सरकारने ५ एप्रिल रोजी अधिसूचना काढली आहे. यात म्हटले आहे की, मालाड पूर्वमधील जमीन या प्रकल्पासाठी डी. बी. रिअ‍ॅलिटीला देण्यात येणार आहे. ही कंपनी ३ हजार ते ४ हजार निवासस्थाने बांधणार आहे. दरम्यान, नाशिकमध्ये ४९ तर श्रीरामपूर येथे ७८ निवासस्थाने म्हाडाकडून खरेदी करण्यात येणार आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. आगामी काही वर्षांतच राज्यातील ६० टक्के पोलिसांसाठी घरांचे काम पूर्ण झालेले असेल, असा विश्वासही या अधिकाऱ्याने व्यक्त केला.

Web Title: 20 thousand houses for the state police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.