हिवाळी अधिवेशनासाठी २० हजार अधिकारी, कर्मचारी नागपुरात मुक्कामी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 09:14 AM2024-12-11T09:14:18+5:302024-12-11T09:14:35+5:30
मंत्र्यांसाठी कॉटेज सज्ज : ४० पीएस व ४१९ पीएदेखील येणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन अवघ्या एका आठवड्यावर आले असताना, प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. हिवाळी अधिवेशनासाठी १८ ते २० हजार अधिकारी-कर्मचारी नागपुरात पोहोचणार आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था विविध निवासी इमारती, शासकीय गेस्ट हाऊस, लॉज आणि वसतिगृहांमध्ये करण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी निवासव्यवस्था पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यानुसार हिवाळी अधिवेशनासाठी येणारे मंत्री, राज्यमंत्री, व्हीआयपी, आमदार, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा अधिकारी, पोलिस कर्मचारी, वाहनचालक आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू आहे.
रवी भवनमधील बंगले तयार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी रामगिरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी देवगिरी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी विजयगड बंगला तयार करण्यात आला आहे.
विधानसभा अध्यक्ष, उपसभापती, विधान परिषद सभापती, उपसभापती आणि विरोधी पक्षनेत्यांसाठी रवी भवनात बंगले तयार झाले आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. रवी भवनमधील २४ बंगले आणि नागभवनमधील १६ बंगले मंत्री व राज्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत आहेत.
मोर्चात येणाऱ्यांसाठी सद्भावना लॉन
हिवाळी अधिवेशनात मोर्चात येणाऱ्यांसाठी जाफरनगर येथील सद्भावना लॉनही ताब्यात घेण्यात आले आहे. सुमारे दोन हजार लोकांसाठी येथे व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दाभा येथे पाच हजार लोकांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.