नव्या विधानसभेत २० महिला आमदार
By admin | Published: October 23, 2014 03:22 AM2014-10-23T03:22:21+5:302014-10-23T03:22:21+5:30
विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दाखिवलेल्या विश्वासामुळे राज्यात वेगवेगळ्या पक्षांच्या २० महिला निवडून आल्या आहेत
मुंब्रा (जि़ ठाणे) : विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दाखिवलेल्या विश्वासामुळे राज्यात वेगवेगळ्या पक्षांच्या २० महिला निवडून आल्या आहेत. गत विधानसभेत केवळ ११ महिला होत्या. नव्या विधानसभेतील सर्वाधिक १२ महिला आमदार भाजपाच्या आहेत. तसेच ५ काँग्रेसच्या, तर ३ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत.
१९९५ ते २००९ या काळात विधानसभेतील महिलांची संख्या ११-१२ पर्यंतच मर्यादित होती. त्यापूर्वीही केवळ १९८० मध्ये सर्वाधिक १९ महिला निवडून आल्या होत्या. आता २८८ सदस्य असलेल्या विधानसभेत महिलांची टक्केवारी ७.२ टक्के झाली आहे.
यंदा तब्बल २७६ महिला निवडणूक रिंगणात होत्या. एकूणच चूल आणि मूल या चौकटीबाहेर पडत इतर क्षेत्रांप्रमाणेच राजकारणातही आपल्या कार्याची छाप पाडत निवडून आलेल्या महिला विधानसभेत विविध विषयांसह विकास कामांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतील, यात शंका नाही! (प्रतिनिधी)