२० वर्षांच्या भोंदूबाबाचा पर्दाफाश
By admin | Published: October 12, 2016 08:24 PM2016-10-12T20:24:59+5:302016-10-12T20:24:59+5:30
अवघे २० वर्ष वय असलेल्या युवकाने ‘भोंदू बाबागिरी’ करत शहादा शहरातील अनेकांना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या शहादा
ऑनलाइन लोकमत
शहादा, दि. 12 - अवघे २० वर्ष वय असलेल्या युवकाने ‘भोंदू बाबागिरी’ करत शहादा शहरातील अनेकांना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या शहादा शाखेने शहरातील विजय नगर भागात राहणारा भोंदू बाबा पोलिसांना पकडून दिला होता़ यावेळी या २० वर्षीय बाबाला पाहून पोलीसही आवक झाले होते.
शहादा शहरातील विजय नगर भागातील उद्धव दामू पाटील यांचे घर गेल्या तीन महिन्यांपासून चार युवकांनी भाड्याने घेतले होते़ यातील तीन जण शहरातील विविध भागात पत्रक वाटप करत होते़ यात बाल ब्रह्मचारी बलवंत महाराज यांच्या नावांची ही पत्रके होती़ यातून बलवंत महाराज हा विवाह समस्या, नोकरी समस्या, पितृदोष, भविष्य, आर्थिक समस्या, मूलबाळ न होणे यासारख्या विविध गोष्टी तडीस लावून देण्याचा दावा करीत होता़ गेल्या तीन महिन्यापांसून हा प्रकार शहादा शहारात सुरू होता़ १६ ते १८ वयोगटातील तीन युवक आणि भोळ्या भाबड्या महिलांना मार्गदर्शनाच्या नावाखाली गंडा घालणारा २० वर्षीय बलवंत महाराज हा युवक अशी चौकडी परिसरात प्रसिद्धीस पावली होती़ त्यांच्या या कारनाम्यांची माहिती अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य सचिव विनायक सावळे यांना मिळाली़ त्यांनी घटनास्थळी जाऊन भोंदू युवकाची भेट घेतली असता़, त्यांना संशय आला़ यावरून त्यांनी डमी ग्राहक व भोंदू बाबा यांच्यात संभाषण घडवून आणत बाबाचे पितळ उघडे पाडले़ या भोंदू बाबाविरोधात शहादा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असता, पोलीसांनी भोंदू बाबा बळवंत यास थेट पोलीस ठाण्यात आणल्यानंतर, त्याने भोंदूपणा करत असल्याची कबुली देत, यानंतर असे करणार नाही, असा लेखी माफीनामा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना दिला आहे.
दरम्यान माफीनामा देऊन शहादा शहर सोडून जामनेर येथे गेलेला हा बाबा तेथील टोळीचा सदस्य असण्याची शक्यता वर्तवली जात आहे़ या टोळीतील अशा एका २० वर्षीय भोंदूबाबावर सातारा येथे गुन्हा दाखल झाल्याची माहिती अंनिसने दिली आहे.
- तीन महिन्यांपासून शहाद्यात बऱ्यापैकी प्रस्थ निर्माण करणाऱ्या बलवंत महाराज याचे खरे नाव दिलीप सुरेश जोशी असे आहे़ तो जामनेर शहरातील डोंगरीनी महाराज नगरातील रहिवासी आहे़ तीन महिन्यांपूर्वी तो त्याच्या सोबतच्या तीन युवकांसह शहाद्यात आला होता़ बलवंत महाराज नावाची पत्रके छापून ‘कार्यसिद्धी’ यज्ञ करून सर्व समस्यांमधून मुक्ती मिळवून देण्याचा दावा तो करत होता़ त्याच्या या दाव्यावर भाडून अनेक जण त्याच्या नादाला लागल्याची माहिती आहे़ यात प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर यांच्यासह काही उच्चशिक्षित व्यक्तींचा समावेश आहे़ खासकरून महिलांसाठी त्याने यंदाच्या नवरात्रोत्सवात सप्तशृंगी गडावरून देवीच्या वापरलेल्या साड्या आणि दागिने मिळवून देतो़ असे अमिष दाखवत लूट चालवली होती़ १०० रूपयांपासून १५ हजार रूपयांपर्यंतच्या विविध समस्यानिवारणाचे त्याचे रेटकार्ड होते़ यानुसार त्याने तीन महिन्यात अनेक जणांना गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे.
- जोशी याने भाड्याने घेतलेल्या खोलीवर पोलीस त्याला घेण्यासाठी गेले असता, त्यावेळी त्याठिकाणी नाशिक शहरात डॉक्टरकी करणारी व्यक्ती सहकुटूंब उपस्थित होती़ त्यासोबतच शहरातील काही महिला समस्या घेऊन आल्याचे दिसून आले होते. पोलीसांना पाहताच ते सर्व गर्भगळीत होऊन तेथून बाहेर पडले होते.