बलात्कारप्रकरणी दोघांना २0 वर्षांची सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2016 08:07 PM2016-08-23T20:07:58+5:302016-08-23T20:07:58+5:30

ळवून नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोघांना प्रत्येकी २0 वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

20 years of rigorous imprisonment for both rape cases | बलात्कारप्रकरणी दोघांना २0 वर्षांची सक्तमजुरी

बलात्कारप्रकरणी दोघांना २0 वर्षांची सक्तमजुरी

Next

ऑनलाइन लोकमत

सांगली,  दि. २३  : पेठ (ता. वाळवा) येथे तेरा महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीस मोटारसायकलवरून पळवून नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोघांना प्रत्येकी २0 वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पहिले जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. या न्यायालयात फाशीनंतर दिलेली सक्तमजुरीची ही सर्वात मोठी शिक्षा ठरली.

प्रवीण ऊर्फ खन्ना पावलस वायदंडे (वय २८) आणि अभिजित ऊर्फ रोहित चंद्रकांत पवार (२१, दोघे रा. पेठ) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. घटनेनंतर फिर्याद दाखल होण्यास २८ दिवसांचा विलंब होऊनही अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सुरेश पाटील (बोरगावकर) यांनी आरोपींना जन्मठेपेपेक्षा जास्तीची शिक्षा घेण्यात यश मिळविले. या खटल्यातून एका अल्पवयीन संशयिताची मुक्तता झाली आहे.

सामुदायिक बलात्काराची ही घटना २0 मार्च २0१५ रोजीच्या रात्री घडली होती. पंधरा वर्षांची पीडित मुलगी घटनेदिवशी रात्री औषध आणण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. औषध घेऊन ती घरी परतत असताना अल्पवयीन साथीदारासह प्रवीण वायदंडे आणि अभिजित पवार यांनी तिला, घरी सोडण्याच्या बहाण्याने सोबत घेण्याचा प्रयत्न केला, पण तिने नकार दिल्याने तिघांनी तिला जबरदस्तीने उचलून मोटारसायकलवर बसवले. तिचे तोंड दाबून, तिला महादेववाडी रस्त्यावरच्या शेतात नेले. तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर घरच्यांना ठार मारण्याची धमकी तिला दिली आणि त्यांनी तेथून पलायन केले.

पीडित मुलगी भयभीत अवस्थेत घरी आली. तिने हा प्रकार घरी सांगितला नाही. त्यामुळे पुन्हा शाळेला जाता—येता हे तिघे तिला धमकावत होते. शेवटी त्रास असह्य झाल्यावर तिने हा प्रकार मैत्रिणीस सांगून आईपर्यंत पोहोचवला. त्यानंतर तिने कुटुंबियांसमवेत येऊन या तिघांविरुध्द फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचा तपास करून एक अल्पवयीन संशयित वगळता इतर दोघांविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले.

न्या. कुलकर्णी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले. हवालदार बाबूराव पाटील, संजय पवार यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले. 


अवघ्या १३ महिन्यांत निकाल
ही घटना २0 मार्च २0१५ रोजी घडली. त्यानंतर २८ दिवसांच्या विलंबाने १७ एप्रिल रोजी पीडित मुलीने फिर्याद दिली. पोलिसांनी दोन महिन्यांच्या तपासानंतर दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने या खटल्याची सुनावणी सुरू करून अवघ्या १३ महिन्यात यातील दोघांना २0 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

जन्मठेपेपेक्षा जास्त शिक्षा
या खटल्यातील अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सुरेश पाटील (बोरगावकर) गेल्या १६ वर्षांपासून या पदावर कार्यरत आहेत. येत्या २५ आॅगस्टरोजी त्यांचा सेवा कालावधी संपत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला दोघा आरोपींना जन्मठेपेपेक्षाही जास्त कालावधीची २0 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा लावण्यात त्यांनी यश मिळविले.

 

Web Title: 20 years of rigorous imprisonment for both rape cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.