कारागृहात वस्तू पुरवठ्याचा २०० कोटींच्या ठेक्याचा वाद; एका विनंती पत्रावर दिला ठेका
By विश्वास पाटील | Published: July 16, 2024 12:51 PM2024-07-16T12:51:45+5:302024-07-16T12:52:44+5:30
कैद्यांनाही आर्थिक फटका बसण्याची भीती
विश्वास पाटील
कोल्हापूर : राज्यभरातील नऊ मध्यवर्ती कारागृहांसह एकूण ५२ कारागृहांतील कैद्यांसाठी असलेल्या कॅंटीनला मालपुरवठा करण्याचा सुमारे २०० कोटींचा ठेका भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघास (एनसीसीएफ) कारागृह प्रशासनाने नुसत्या एका विनंती पत्रावर दिला आहे. याविरोधात या कँटीनला मालपुरवठा करणारे राज्यभरातील शंभरांवर अधिक व्यापारी एकवटले आहेत. हा ठेका देण्यात काहींचे आर्थिक हितसंबंध गुंतलल्यानेच हा व्यवहार झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
कारागृहात कैद्यांना जे पैसे मिळतात किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून आलेल्या पैशांतून ते दैनंदिन लागणाऱ्या वस्तू या कॅंटीनमधून खरेदी करतात. या खर्चाची महिन्याला ५ हजारांपर्यंतची मर्यादा आहे. राज्य शासनानेच २०१५ च्या आदेशानुसार त्यासाठी लागणाऱ्या सुमारे ६०० विविध प्रकारच्या वस्तू कुणाकडून खरेदी कराव्यात, याची नियमावली निश्चित करून दिली आहे.
त्यानुसार २०१८ पासून प्रत्येक कारागृह ऑनलाइन निविदा मागवून ही खरेदी करते, परंतु ते बंद करून अचानक यावर्षीपासून मालपुरवठ्याची जबाबदारी भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघास दिली. त्यांनी कारागृह प्रशासनाकडे तशी विनंती केली होती. छापील किमतीत ५ टक्के सवलत देतो, असे सांगितल्यावर अन्य कोणतीच प्रक्रिया न राबवता शासनाने या संघास हा ठेका दिला असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
वादाचे मुद्दे काय..
- दूध, चिकन, भाजीपाला, अंडी अशा अनेक वस्तूंचे दर जिल्हानिहाय वेगवेगळे आहेत. एनसीसीएफ राज्य पातळीवर एकाच दराने वस्तूपुरवठा करणार असल्याने त्याचा आर्थिक फटका कैद्यांना बसणार आहे.
- छापील किमतींपेक्षा स्पर्धात्मक दरात अनेक वस्तू सरासरी वीस ते चाळीस टक्क्यांपेक्षा स्वस्त मिळतात, मग ५ टक्क्यांचे आमिष कशासाठी?
- एनसीसीएफने हवे असल्यास सर्व कारागृहांत निविदा भरून जरूर हा ठेका घ्यावा.
एक नुसते विनंती पत्र दिल्यावर कारागृह प्रशासनाने राज्यातील मालपुरवठ्याचा ठेका या संघास दिला आहे. त्यामागे कुणाचे आर्थिक हितसंबंध आहेत, याची चौकशी व्हायला हवी. - हेमंत सूर्यवंशी, कारागृह उपहारगृह पुरवठादार व्यापारी असोसिएशन राज्य
ग्राहक संघाचे दर हे बाजारभावापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे कैद्यांना त्याचा आर्थिक फटका बसू शकतो. आमच्या मालपुरवठ्याबद्दल एकही तक्रार नसताना शासन छोट्या व्यापाऱ्यांच्या पोटावर का उठले आहे ? - मनोज खानविलकर, कारागृह उपहारगृह पुरवठादार व्यापारी असोसिएशन कोल्हापूर.
कांही वस्तूंच्या प्रतिकिलो दरातील तफावत
वस्तू : एनसीसीएफ : व्यापारी
चिकन - २५० : १९४
मिक्स फरसान - १७५ : ९५.६०
लसूण शेव - १८० : ११९.८०
बटाटा वेफर्स - २१० : १९२
बिसलरी बॉटल - १९ : १२.६०