‘जुन्या इमारतींसाठी २०० कोटींचा निधी’
By admin | Published: April 2, 2016 01:29 AM2016-04-02T01:29:16+5:302016-04-02T01:29:16+5:30
अर्थसंकल्पात मुंबईकरांच्या घरांसाठी उदार धोरण आखत विविध योजनांची घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केली. त्यात जुन्या घरांसाठी २०० कोटी रु पये, बी.डी.डी. चाळींची
मुंबई : अर्थसंकल्पात मुंबईकरांच्या घरांसाठी उदार धोरण आखत विविध योजनांची घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केली. त्यात जुन्या घरांसाठी २०० कोटी रु पये, बी.डी.डी. चाळींची योजना, धारावी पुनर्वसन प्रकल्प, गिरणी कामगारांच्या घरांसाठी दोन वेळा लॉटरी आदींचा समावेश आहे.
२०१६-१७च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मेहता म्हणाले की, सरकारने सेस इमारतींसाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. मुंबईसाठी उदार धोरण राबवत असताना मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी २०० कोटी रु पये खर्च करणार आहे. पाच वर्षांत म्हाडा, एमएमआरडीए आदी सहा एजन्सीमार्फत जवळपास ६ लाख ७३५ घरे उभारली जाणार आहेत. यातही मुंबईत म्हाडाच्या माध्यमातून १ लाख परवडणारी घरे उभारली जाणार आहे. बीडीडी चाळींच्या योजना पूर्ण केल्या जाणार आहेत. चाळीत अनेक पिढ्यांपासून राहणाऱ्या पोलिसांना तेथेच मालकी हक्काची घरे दिली जाणार आहेत. मात्र हा वाद न्यायालयात सुरू असल्यामुळे त्याला पूर्णत्व देता आले नाही. धारावीचा प्रकल्पही गती घेत आहे. १६ विकासकांनी त्यात सहभाग घेतला असून, त्याचे ई-टेंडरिंगही झाले आहे. धारावीतील एकही पारंपरिक उद्योग प्रकल्पाच्या बाहेर जाऊ दिला जाणार नाही. गिरणी कामगारांसाठी या वर्षात २ लॉटऱ्या काढल्या जाणार आहेत. त्याच्या कृती समितीबरोबर ४-५ दिवसांत मुख्यमंत्र्यांसह बैठक होऊन त्याला अंतिम रूप दिले जाणार आहे. मुंबईतील संक्रमण शिबिरांच्या बाबतीत ५ विकसकांनी सुमारे ८० कोटी ५० लाख रुपयांची रक्कम थकवली आहे. त्यांच्या विरोधात खटले दाखल केले असून, विशेष मोहिमेद्वारे कारवाई पूर्ण केली जाईल, असेही मेहता यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)