दुबईत २०० कोटींचे लग्न, १५० चार्टर विमानांनी फोडले महादेव ॲपचे ‘बिंग’! ईडीने उघडला तिसरा डोळा अन्...

By मनोज गडनीस | Published: October 10, 2023 10:57 AM2023-10-10T10:57:00+5:302023-10-10T10:58:20+5:30

मात्र, या ॲपद्वारे कंपनीच्या प्रवर्तकांनी काय व कसा घोटाळा केला व तो उजेडात कसा आला, याबद्दलदेखील मोठ्या प्रमाणावर कुतूहल व्यक्त होत आहे. या घोटाळ्याची माहिती देणारे हे वृत्त.

200 crore wedding in Dubai, 150 charter planes broke Mahadev app's scam ED opened the third eye and... | दुबईत २०० कोटींचे लग्न, १५० चार्टर विमानांनी फोडले महादेव ॲपचे ‘बिंग’! ईडीने उघडला तिसरा डोळा अन्...

दुबईत २०० कोटींचे लग्न, १५० चार्टर विमानांनी फोडले महादेव ॲपचे ‘बिंग’! ईडीने उघडला तिसरा डोळा अन्...

मुंबई : दुबईस्थित कंपनीकडून चालविल्या जाणाऱ्या महादेव ॲपप्रकरणी बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) समन्स जारी झाल्यानंतर महादेव ॲप हे आता चांगलेच चर्चेत आले आहे. मात्र, या ॲपद्वारे कंपनीच्या प्रवर्तकांनी काय व कसा घोटाळा केला व तो उजेडात कसा आला, याबद्दलदेखील मोठ्या प्रमाणावर कुतूहल व्यक्त होत आहे. या घोटाळ्याची माहिती देणारे हे वृत्त.

- सौरभ चंद्राकर व रवी उप्पल या दोघांनी या कंपनीची - महादेव ॲपची निर्मिती केली.
- या ॲपद्वारे लोकांना तीन पत्ती, पोकर, चान्स गेम, बॅडमिंटन, टेनिस, फूटबॉल, क्रिकेट आदी खेळांसाठी सट्टेबाजी करण्याची सुविधा पुरवण्यात आली.
- भारतामध्ये सट्टेबाजी अवैध आहे.
-  या कंपनीने या ॲपच्या प्रमोशनसाठी बॉलीवूडमधील नामांकित सेलिब्रिटींना मानधन देत त्यांच्याद्वारे या खेळाचे प्रमोशन केले.
- ग्राहकांना कंपनीच्या वेबसाइटवर अथवा व्हॉट्सॲपवरून या खेळांच्या लिंक देण्यात आल्या.
- या लिंकवर क्लिक केल्यानंतर कंपनीतर्फे एक युझर आयडी व लॉगइन देण्यात आले.
-  युझर आयडी तयार झाला की, संबंधित ग्राहकाला त्या ॲपच्या वॉलेटमध्ये पैसे भरावे लागत होते.
- हे पैसे भरल्यानंतर त्याला सट्टेबाजी करता येत होती.
-  सट्टा जिंकला तर ग्राहकाला ठरल्यानुसार पैसे मिळत होते.
- ॲपचा गैरप्रकार उजेडात आल्यानंतर कंपनीला फटका बसू नये, याकरिता कंपनीने तीन ते चार वेबसाइट तसेच चार आणखी ॲप तयार करत त्याद्वारेदेखील व्यवहार सुरू ठेवले होते.

काय घोटाळा केला
१ युझर आयडी मिळाल्यानंतर ग्राहकांनी जे पैसे कंपनीच्या खात्यात जमा केले. ते पैसे हेच कंपनीचे खरे उत्पन्न होते. 
२ प्रत्येकवेळी ग्राहक जिंकत होता असे नाही, तर त्याला सवय लागल्यामुळे तो अधिकाधिक पैसे त्याच्या ॲपवरील वॉलेटमध्ये भरत होता. 
३ एखादा ग्राहक जिंकला तर त्याला कंपनीतर्फे दिले जाणारे पैसे बँक खात्यातून संबंधित ग्राहकाला मिळत होते. 
४ मात्र, हे बँक खातेदेखील कंपनीच्या नावावर नव्हते. तर याकरिता काही लोकांच्या ओळखपत्राचा आधार घेत ही खाती उघडण्यात आली होती.
५ या खात्यातून व्यवहार चालत होते.

बॉलिवूडच्या कलाकारांची बडदास्त
सौरभ चंद्राकर याने लग्नासाठी तब्बल २०० कोटी रुपये रोखीने खर्च केल्याचे ईडीच्या तपासात दिसून आले आहे. त्याच्या लग्नाकरिता बॉलिवूड कलाकारांच्या प्रवास, निवासाची व्यवस्था आणि त्यांच्या सादरीकरणासाठी देण्यात आलेले मानधन असे सर्व व्यवहार रोखीने झाले. बॉलिवूडकरिता या प्रकरणात ४२ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आहे.

किती पैशांचा गैरव्यवहार?
सक्तवसुली संचालनालयाने या घोटाळ्याची चौकशी सुरू केल्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती जवळपास संपूर्ण देशात असल्याचे दिसून आले आहे.

देशभरातील लाखो ग्राहकांनी आपल्या युझर आयडीच्या माध्यमातून जे पैसे ॲपमध्ये भरले, त्याचा प्राथमिक अंदाज हा पाच हजार कोटी रुपये इतका आहे.

प्रकरण उजेडात नेमके आले कसे
- कंपनीचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याचा विवाह फेब्रुवारी २०२३मध्ये दुबईत झाला.
- या लग्नाकरिता भारतातून अनेक नामवंत बॉलिवूड कलाकार, काही बड्या हस्ती उपस्थित राहिल्या. 
- या लोकांना दुबईत नेण्याकरिता भारतातून १५०पेक्षा जास्त चार्टर्ड विमाने घेण्यात आली होती.
- एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर चार्टर्ड विमाने दुबईत जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तपास यंत्रणा अलर्ट झाल्या व त्यांनी तपास सुरू केला.

Web Title: 200 crore wedding in Dubai, 150 charter planes broke Mahadev app's scam ED opened the third eye and...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.