टोमॅटोचा किरकोळ बाजारात दर २०० वर; चमक आणखी वाढली
By मोरेश्वर मानापुरे | Published: July 30, 2023 07:51 PM2023-07-30T19:51:49+5:302023-07-30T19:52:32+5:30
किरकोळमध्ये २०० रुपये : ७ ट्रकची आवक; अन्य भाज्या उतरल्या
नागपूर : काही दिवसांआधी कमी झालेली टोमॅटोची चमक आणखी वाढली आहे. किरकोळमध्ये १४० रुपयांपर्यंत कमी झालेले भाव पुन्हा २०० रुपयांवर पोहोचले आहेत. सध्या तरी टोमॅटो गृहिणींच्या स्वयंपाकघराचा भाग राहिलेला नाही. आवक सुरुळीत झाल्यानंतर भाव कमी होण्याची अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली.
मदनपल्ली, किल्लोर, संगमनेर येथून आवक
टोमॅटोची आवक आंध्रप्रदेशच्या मदनपल्ली, किल्लोर आणि अहमदनगरच्या संगमनेर येथून सुरू आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात शेतात पाणी साचल्यामुळे टोमॅटोची तोडणी बंद असून शेतात खराब झाले आहे. काहींचा दर्जा खालावला आहे. शिवाय अनेक कारणांनी टोमॅटो पुरेशा प्रमाणात बाजारात येणे बंद झाले आहे. बेंगळुरू येथील टोमॅटो नागपूर बाजारात येण्यास एक महिना लागणार आहे.
व्यापारी ऑर्डरनुसार माल विक्रीसाठी मागवित आहेत. रविवारी दर्जानुसार टोमॅटोचे क्रेट (२५ किलो) भाव ३ हजार ते ३५०० रुपये होते. तर किरकोळमध्ये २०० किलो रुपये दराने विक्री झाली. टोमॅटो महाग असल्यानंतरही काही लोक खरेदी करीत असल्याचे कळमना ठोक बाजाराचे विक्रेते अविनाश रेवतकर यांनी सांगितले.
दुसरीकडे टोमॅटोचे भाव पाहून अनेक किरकोळ विक्रेत्यांनी विक्री बंद केली आहे. ऑगस्ट महिन्यात संगमनेर, नाशिक आणि बेंगळुरू येथून टोमॅटोची आवक सुरू झाल्यानंतर भाव मोठ्या प्रमाणात कमी होतील. शिवाय स्थानिक शेतकऱ्यांकडून सप्टेंबरच्या अखेरपर्यंत माल येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत टोमॅटोचे जास्त भावातच खरेदी करावे लागतील, असे मत कॉटन मार्केटचे अडतिये राम महाजन यांनी व्यक्त केले.
वांगे, फूल कोबी, कोथिंबीर आवाक्यात
सध्या वांगे, फूल कोबी, पत्ता कोबी, कोथिंबीर, मेथी, पालक, भेंडी, फणस आणि अन्य भाज्यांचे भाव आवाक्यात आले आहेत. तर अद्रक, लसूण, हिरवी मिरचीसह कारले, ढेमस या भाज्यांचे भाव जास्त आहेत. औरंगाबाद आणि अन्य भागातून फूल कोबीची आवक वाढल्यामुळे किरकोळमध्ये भाव ४० रुपये किलोपर्यंत कमी झाले आहेत.