‘सेवाहमी’च्या २०० सेवा आॅनलाइन
By admin | Published: December 1, 2015 01:21 AM2015-12-01T01:21:23+5:302015-12-01T01:21:23+5:30
सेवा हमी कायद्यांतर्गत येत्या २६ जानेवारीपर्यंत २०० सेवा आॅनलाइन करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
मुंबई : सेवा हमी कायद्यांतर्गत येत्या २६ जानेवारीपर्यंत २०० सेवा आॅनलाइन करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
येथील हॉटेल ताजमध्ये स्मार्ट हेल्थ, स्मार्ट गव्हर्नन्स, स्मार्ट सिटीसाठी डिजिटल तंत्रज्ञान या विषयावर ई-इंडिया महाराष्ट्र समिट आयोजित करण्यात आली होती. या समिटच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
केंद्रीय नगरविकास विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही.के. गौतम, नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर आदी मान्यवर उपस्थित होते. शहरीकरणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. राज्य शासनाने स्मार्ट सिटींवर भर दिला असून, नागरिकांना उत्कृष्ट पायाभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण राहणीमानासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शहरांच्या शाश्वत विकासाचा आराखडा तयार करण्यात आला पाहिजे, असे सांगून ते म्हणाले की, सिडकोच्या नवी मुंबई येथील देशातील पहिल्या स्मार्ट सिटीचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार आहे. स्मार्ट शहरांबरोबरच स्मार्ट गावे विकसित होणे आवश्यक आहे. (विशेष प्रतिनिधी)
मुंबई पॅटर्न राज्यात
‘इझ आॅफ डुर्इंग बिझनेस’साठी इमारतींच्या प्रकल्प आराखड्यांना मंजुरी देण्यासाठी मुंबई महापालिकेने जी पद्धती अवलंबली आहे, ती पद्धत राज्यातील अन्य महापालिका व नगरपालिकांमध्ये राबविण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. भाटिया यांनीही नवी मुंबई स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सादरीकरण केले.