दुधाचे २०० टँकर मुंबईकडे रवाना

By admin | Published: June 3, 2017 03:48 AM2017-06-03T03:48:32+5:302017-06-03T03:48:32+5:30

साखर आणि दुधाचे आगार असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी उत्स्फूर्तपणे संपात सहभागी झाल्याने दूध संकलनावर मोठा परिणाम

200 tankers of milk departing to Mumbai | दुधाचे २०० टँकर मुंबईकडे रवाना

दुधाचे २०० टँकर मुंबईकडे रवाना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : साखर आणि दुधाचे आगार असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी उत्स्फूर्तपणे संपात सहभागी झाल्याने दूध संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. शुक्रवारी कडक पोलीस बंदोबस्तात दुधाचे २०० टँकर कसेबसे मुंबईकडे रवाना करण्यात आले. भाजीपाल्यासह इतर सर्व शेतमालाची आवक रोडवल्याने दर अव्वाच्या सव्वा वाढल्याचे चित्र बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.
संपाचा थेट फटका कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघांना बसला आहे. ‘गोकूळ’, ‘वारणा’सह ‘स्वाभिमानी’ दूध संघाच्या रोजच्या संकलनात तब्बल एक लाख लीटरहून अधिक घट झाली आहे. भाजीपाल्याच्या दरात कमालीची वाढ झाली असून, बाजार समितीमध्ये शुक्रवारी केवळ तीन ट्रक कांदा व तेवढीच बटाट्याची आवक झाल्याने आजपासून या मार्केटबरोबरच भाजीपाला मार्केट कोलमडणार हे निश्चित आहे.

सांगलीत वाहतूक रोखली
सांगली : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाळवा, तासगाव, पलूस, मिरज, आटपाडी तालुक्यात दूध व भाजीपाला वाहतूक रोखण्यात आली. भाजीपाल्याची आवक घटली आहे. शेतकऱ्यांनी दूध केंद्रांवर दूध न घालता त्याचे लोकांना वाटप केले. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा  पाहून सहकारी दूध संस्था आणि खासगी दूध संकलन केंद्रांनी संकलन बंद केले. कवठेएकंद (ता. तासगाव) येथे शेतकऱ्यांनी डविलेले सुमारे हजार लीटर दूध गरजूंना वाटण्यात आले.


सामूहिक मुंडण
सटाणा तालुक्यातील (जि. नाशिक) शेतकऱ्यांनी सामूहिक मुंडण करून सरकारचा निषेध नोंदविला, तर बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथे दुधाचे टँकर अडवून महिला व शेतकऱ्यांनी दुधाने अंघोळ केली.

संघाची टीका
शेतकऱ्यांवर संप करण्याची वेळ यावी, हे दुर्दैवी आहे. मात्र या संपामागे विरोधकांची चिथावणी आहे, अशी टीका राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते आणि स्वयंसेवक मा.गो. वैद्य यांनी केली आहे.

Web Title: 200 tankers of milk departing to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.