२०० टन कोळसा उत्पादन ठप्प
By admin | Published: September 15, 2014 12:59 AM2014-09-15T00:59:18+5:302014-09-15T00:59:18+5:30
सिनाळा भूमिगत कोळसा खाणीत शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीतून निघणाऱ्या विषारी वायूने बेशुद्धावस्थेत अडकून पडलेल्या ५५ कामगारांना सुखरूप बाहेर काढले.
सिनाळा खाण सील : स्थिती सामान्य होण्यास दोन ते तीन महिन्यांचा कालावधी
चंद्रपूर : सिनाळा भूमिगत कोळसा खाणीत शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीतून निघणाऱ्या विषारी वायूने बेशुद्धावस्थेत अडकून पडलेल्या ५५ कामगारांना सुखरूप बाहेर काढले. आता त्यांची प्रकृती ठीक आहे. मात्र खाणीला सील ठोकण्यात आले असून या खाणीतून होणारे रोजचे २०० टन कोळशाचे उत्पादन ठप्प झाले आहे. खाणीतील आग पूर्णपणे विझायला आणखी दोन ते तीन महिने लागणार असल्याचे सूत्राने सांगितले. दरम्यान, घटनेची चौकशी करण्यासाठी कलकत्ता, धनबाद व नागपूर वेकोलि मुख्यालयातून चमू आल्या असून चौकशी सुरू आहे.
दुर्गापूर खुल्या कोळसा खाणीलगतच सिनाळा भूमिगत कोळसा खाण आहे. शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास या खाणीत अचानक आग लागली. सुरुवातीला ही आग कमी प्रमाणात होती. नंतर हळूहळू या आगीने रौद्ररुप धारण केले. आग लागली तेव्हा खाणीत १५० कर्मचारी काम करीत होते. कार्बन मोनॉक्साईडसारखा विषारी वायू उत्सर्जीत होऊन ५५ कामगार घटनास्थळावरच बेशुद्ध झाले होते. आता या कामगारांची प्रकृती ठिक असल्याची माहिती आहे.
रविवारी सिनाळा खाण सील करण्यात आली. बाहेरून खाणीत हवा सोडणारा पंखा आक्सिजन मिळून पुन्हा आग भडकू नये म्हणून बंद करण्यात आला आहे. या खाणीत एकूण ४१५ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे लालपेठ व आजुबाजुच्या इतर खाणींमध्ये समायोजन करण्यात येणार असल्याचे मुख्य महाव्यवस्थापक आर.के. मिश्रा यांनी सांगितले. या खाणीतून दररोज २०० टन कोळसा उत्पादित केला जातो. भूमिगत खाणीतील आग पूर्णपणे विझायला आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या खाणीतील उत्पादन आता ठप्प झाले आहे. त्यामुळे वेकोलिला कोट्यवधींचा फटका सहन करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, या खाणीतील कोळसा जी-७/जी-८ या प्रकारातला असून तो उच्च दर्जाचा समजला जातो. (प्रतिनिधी)