ग्रामीण तीर्थक्षेत्रांचा विकास करणार, दोन हजार कोटींचा अतिरिक्त निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 05:39 AM2024-03-01T05:39:06+5:302024-03-01T05:39:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क    मुंबई : महायुती सरकारने तीर्थक्षेत्रांना वाढीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्रातील अनेक संत महंत, कीर्तनकार ...

2000 crore additional funds to develop rural pilgrimage sites | ग्रामीण तीर्थक्षेत्रांचा विकास करणार, दोन हजार कोटींचा अतिरिक्त निधी

ग्रामीण तीर्थक्षेत्रांचा विकास करणार, दोन हजार कोटींचा अतिरिक्त निधी

लोकमत न्यूज नेटवर्क   
मुंबई : महायुती सरकारने तीर्थक्षेत्रांना वाढीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्रातील अनेक संत महंत, कीर्तनकार आदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा विधिमंडळात सत्कार केला व आभार व्यक्त केले. यावेळी ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी वारकऱ्यांना दिले.

ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांचा पायाभूत विकास होण्याकरिता शाश्वत वाढीव निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेला नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मंजुरी देण्यात आली व आता सदर योजनेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रांना सुमारे २००० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच पर्यटन विभागामार्फत देखील प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सुमारे १००० कोटी रुपयांचा निधी हा तीर्थक्षेत्रांच्या पर्यटन विकासासाठी उपलब्ध करून दिला आहे. या अनुषंगाने अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले व यांच्या समवेत सर्व ह.भ.प. महंत शिवाजी महाराज, लक्ष्मण दशरथ मेंगडे, परमेश्वर गणपत बोधले, लक्ष्मण बाबुराव तकीक, विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी, राधाबाई ज्ञानोबा सानप आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या भव्य काशी दिव्य काशी, बद्री केदार देवस्थान विकास, उज्जैन येथील महाकाल कॉरिडोअर, अयोध्यास्थित प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर विकास या संकल्पनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महत्वपूर्ण अशा तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेस मंजुरी दिली. आता ब वर्गातील तीर्थक्षेत्रांना दोन कोटीऐवजी पाच कोटींचा विकासनिधी उपलब्ध होत आहे. 

या निधीतून काय करता येईल?
तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मंदिरापर्यंत रस्ते, पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे, स्वच्छतागृह, शौचालय, वाहनतळ, भक्त निवास, रस्त्यावरील दिवे आणि संरक्षण भिंत, वृक्ष लागवड करणे इत्यादी सुविधा या निधीतून उपलब्ध करून दिल्या जातील.

Web Title: 2000 crore additional funds to develop rural pilgrimage sites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.