२ हजार कोटींचे इफेड्रिन नष्ट होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 04:21 AM2017-08-02T04:21:48+5:302017-08-02T04:22:18+5:30
सोलापूर येथील एका कंपनीमधून ताब्यात घेतलेले दोन हजार कोटी रुपयांचे इफेड्रिन नष्ट करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने १0 जुलै रोजी दिले.
ठाणे : सोलापूर येथील एका कंपनीमधून ताब्यात घेतलेले दोन हजार कोटी रुपयांचे इफेड्रिन नष्ट करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने १0 जुलै रोजी दिले. त्यानंतर, ठाणे पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मंगळवारी यासाठी मंडळाची ना हरकत मागितली.
१३ एप्रिल २0१६ रोजी ठाणे पोलिसांनी दोन आरोपींकडून १२ लाख रुपयांचे इफेड्रिन जप्त केले होते. या दोघांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सोलापूर येथील एव्हॉन लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या फॅक्टरीवर छापा टाकून २ हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिनची देश-विदेशात तस्करी करणाºया रॅकेटचा भंडाफोड केला होता. अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा कथित प्रेमी विकी गोस्वामी हादेखील या प्रकरणात आरोपी असून, न्यायालयाने अलीकडेच त्यांना फरार घोषित केले.
गेल्या वर्षभरापासून जवळपास १८ टन अमलीपदार्थांचा हा साठा सोलापूर येथील कंपनीमध्ये असून, त्याच्या सुरक्षेसाठी दररोज २४ पोलिसांचा पहारा आहे. दरम्यान, अमलीपदार्थ नष्ट करण्यासाठी शासनाची विशेष समिती कार्यरत असते. न्यायालयाच्या आदेशानुसार, इफेड्रिनचा साठा नष्ट करण्यासाठी या विशेष समितीकडे प्रस्ताव पाठविला जाईल, असे सहायक पोलीस आयुक्त भारत शेळके यांनी सांगितले.