मतदारांसाठी लागणार 2000 लिटर शाई; प्रत्येक मतदान केंद्रावर असतील १० मिलीच्या दोन बाटल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 08:54 AM2024-03-22T08:54:37+5:302024-03-22T08:55:39+5:30

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीला सुरुवात झाली आहे. सर्वत्र आता प्रचार-प्रसाराला वेग येईल.

2000 liters of ink required for voters; Each polling station will have two bottles of 10 ml each | मतदारांसाठी लागणार 2000 लिटर शाई; प्रत्येक मतदान केंद्रावर असतील १० मिलीच्या दोन बाटल्या

मतदारांसाठी लागणार 2000 लिटर शाई; प्रत्येक मतदान केंद्रावर असतील १० मिलीच्या दोन बाटल्या

संतोष आंधळे/दीपक भातुसे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीला सुरुवात झाली आहे. सर्वत्र आता प्रचार-प्रसाराला वेग येईल. जसजसे मतदानाचे टप्पे पुढे सरकत जातील तसतसा प्रचार शिगेला पोहोचेल. रंगत वाढत जाईल. विविध रंगांच्या झेंड्यांच्या गर्दीत बोटावर लावलेली शाई अधिक उठून दिसेल. तीच मतदाराची शक्ती. पाच वर्षांतून एकदा वापरता येणारी. या शाईला अनन्यसाधारण महत्त्व असून, राज्यभरात तब्बल दोन हजार लिटर शाई लागणार आहे.

निवडणुकीत मतदान केले की मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. तुम्ही मतदानाचा हक्क बजावला आहे, हे दर्शवणारी ती शाई. या शाईची निर्मिती कर्नाटकातील एका कंपनीकडून केली जाते. राज्यभरातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी ९७ हजार ३२५ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली असून, या मतदारसंघांमध्ये ही शाई उपलब्ध राहणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेत ही माहिती नमूद असून आयोगात सूत्रांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली.

आणखी ७८० मतदार संघ

राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सध्याच्या एकूण मतदान केंद्रांव्यतिरिक्त आणखी ७८० मतदार केंद्रे वाढवून द्यावीत अशी मागणी केली आहे. त्यावर लवकरच निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवमतदारांमध्ये उत्सुकता

  • आपल्या बोटावर लागलेल्या शाईचा फोटो मतदारांकडून समाजमाध्यमांवर प्रसारित केला जातो. त्यातही नवमतदार याबाबत अधिक उत्सुक असतात.
  • वलयांकित व्यक्तीही मतदान केल्याचे दर्शविण्यासाठी समाजमाध्यमांवर छायाचित्रे प्रसारित करत असतात. ही शाई इंडेलिबल इंक म्हणून प्रसिद्ध आहे.
  • सुरुवातीला जांभळी वाटणारी शाई बोटाला लावल्यानंतर काळी पडते. 
  • एकदा ही शाई बोटावर लावली की काही सेकंदातच ती तत्काळ सुकते. त्याशिवाय ही शाई कुठल्याही रसायने, साबणाने पुसली जात नाही. 


प्रमाण कसे?

प्रत्येक मतदान केंद्रावर १० मिलीची एक अशा दोन शाईच्या बाटल्या ठेवलेल्या असतात. मतदानाची प्रक्रिया पार पडली की ती बोटाला लावली जाते. राज्यातील मतदान केंद्रांच्या संख्येचा विचार केल्यास राज्यभरात सातही टप्प्यांसाठी १ हजार ९४६ लिटर शाईची गरज भासणार आहे. त्याशिवाय राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने काही वाढीव मतदारसंघांची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. तो आकडा ग्राह्य धरून जवळपास २००० लिटर शाई या निवडणुकीत राज्यात मतदारांच्या बोटाला लागणार आहे.

Web Title: 2000 liters of ink required for voters; Each polling station will have two bottles of 10 ml each

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.