2022पर्यंत नवी मुंबईचं चित्र पालटेल, हवाई, रस्ते वाहतुकीत होतील मोठे बदल- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 04:57 PM2018-02-18T16:57:13+5:302018-02-19T03:06:10+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करण्यात आले. त्याचबरोबर जेएनपीटीच्या चौथ्या बंदराचे मोदींनी उद्घाटन केले.
नवी मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करण्यात आले. त्याचबरोबर जेएनपीटीच्या चौथ्या बंदराचे मोदींनी उद्घाटन केले. त्यानंतर सभास्थळी उपस्थितांना मोदींनी संबोधित केले. मोदी म्हणाले, 2022पर्यंत नवी मुंबईचं चित्र पालटणार असून, हवाई वाहतूक, रस्ते वाहतुकीत मोठे बदल झालेले दिसतील. तसेच शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकासह सर्व महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण होणार आहेत.
देशात एव्हिएशन पॉलिसी नव्हती, आमच्या सरकारने पॉलिसी आणली. एव्हिएशन सेक्टरमधील सुधारणांमुळे देशातील पर्यटन क्षेत्रास चालना मिळणार असल्याचे सूतोवाच मोदींनी केले आहेत. देशात 450 खासगी सरकारी विमाने आहे. सरकारने 900 नवीन विमाने खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. देशातील सर्वात मोठं ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत होणार आहे. 1997मध्ये अटलबिहारी सरकारने विमानतळांचे स्वप्न पाहिले होते. परंतु नंतरच्या सरकारने काहीही केले नाही. हा प्रोजेक्ट कागदावर होता. आम्ही सर्व अडथळे दूर करून या प्रकल्पाचे भूमिपूजन केले आहे. लटकाना.. अटकाना.. पटकाना हे पूर्वीच्या सरकारचे धोरण होते, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे.
सागरी मार्गांचा जास्तीत जास्त वापर करण्याची सरकारची योजना आहे. सागरी मार्गाचा वापर केल्यास कमी वेळेत जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात माल पोहोचवू शकतो. साडेसात हजार किलोमीटरच्या समुद्राचा आपण लाभ घेतला पाहिजे. जागतिक बाजारपेठेत भारताला प्रभुत्व मिळवायचं असल्यास सागरी मार्गाच्या ताकदीला वाढवलं पाहिजे. जागतिक बाजारपेठेत सामूहिक व्यापार महत्त्वाचा असतो, छत्रपती शिवाजी महाराजांनीही सामरिक ताकद ओळखली होती, असंही मोदी म्हणाले आहेत. तसेच नितीन गडकरींच्या नेतृत्वात भारतातील रस्ते वाहतुकीत प्रगती होत असून, भारताच्या पॉवर सेक्टरला नवी चालना मिळाल्याचं मोदींनी सांगितलं आहे.