२०२५ : विकासाच्या नकाशावर कुठे असेल आपला महाराष्ट्र? ‘लोकमत’च्या राज्यस्तरीय परिषदेत उलगडणार विकासाचा रोडमॅप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 10:25 AM2021-12-04T10:25:25+5:302021-12-04T10:25:47+5:30
Maharashtra News: समृद्धीच्या महामार्गावर निघालेला महाराष्ट्र २०२५ मध्ये विकासाच्या नकाशावर कुठे असेल, त्यातील टप्पे कसे असतील याचा शोध घेणारी राज्यस्तरीय परिषद लोकमत समूहाच्या वतीने मुंबईत आयोजित करण्यात येत आहे.
मुंबई : समृद्धीच्या महामार्गावर निघालेला महाराष्ट्र २०२५ मध्ये विकासाच्या नकाशावर कुठे असेल, त्यातील टप्पे कसे असतील याचा शोध घेणारी राज्यस्तरीय परिषद लोकमत समूहाच्या वतीने मुंबईत आयोजित करण्यात येत आहे. बुधवार, ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या या राज्यस्तरीय परिषदेत विविध विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी राज्याच्या विकासाचा रोडमॅप मांडणार आहेत.
नागरी भागातील पायाभूत सुविधांची स्थिती, उद्योगधंद्यांच्या भरभराटीसाठी पायाभूत सुविधांचा विकास, पायाभूत सुविधांच्या उभारणीचे अर्थकारण, गृहनिर्माणातील आव्हाने, महानगरपालिकांच्या सेवांचा दर्जा वाढविणे यांच्याशी निगडित विषयांवर या परिषदेत विचारमंथन होणार आहे. त्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे मान्यवर राज्याच्या विकासरथाची दिशा उलगडणार आहेत.
त्यांच्यासोबत, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी, सिडकोचे एमडी संजय मुखर्जी, एमएसआरडीसीचे एमडी राधेश्याम मोपलवार, एमआयडीसीचे सीईओ पी. अनबलगन, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., ठाणे महापालिकेचे आयुक्त विपिन शर्मा, साईबाबा संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बनायत हे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या विकास नकाशाची मांडणी करणार आहेत.
विविध महत्त्वाच्या विषयांवर होणार मंथन
n लोकमत इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्क्लेव्ह -२०२१ मध्ये पायाभूत सुविधांची सद्य:स्थिती, त्यातील बदलाचे मोठे टप्पे, त्यातील अडचणी, त्यावरची उपाययोजना आदींबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.
n त्याशिवाय, वरिष्ठ अधिकारी त्यांच्या विभागाचे सध्याचे प्रकल्प, आगामी विस्तार, त्याची आर्थिक बाजू, प्रकल्प व्यवस्थापन याचे सादरीकरणही करणार आहेत. या परिषदेत होणाऱ्या चर्चेतून राज्याच्या विकासपथावरील वाटचालीचे सर्वांगीण चित्र उभे राहणार आहे.