2030 पर्यंत सर्वच क्षेत्रात महिलांचे प्रमाण 50 टक्के हवे, समाजाकडून एकत्रित प्रयत्नांची गरज : निलम गो-हे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 07:27 PM2017-09-17T19:27:59+5:302017-09-17T19:28:46+5:30
महिलांच्या अथक संघर्षामुळे त्यांना आरक्षण मिळाले आहे.राजकीय आरक्षणामुळे त्यांनालोकसभा,विधानसभा,महापालिका इत्यादी ठिकाणी आरक्षण मिळाले आहे. मात्र आरक्षण हेच ध्येय नाही तर ते एक साधन आहे.
पुणे, दि. 17 - महिलांच्या अथक संघर्षामुळे त्यांना आरक्षण मिळाले आहे.राजकीय आरक्षणामुळे त्यांनालोकसभा,विधानसभा,महापालिका इत्यादी ठिकाणी आरक्षण मिळाले आहे. मात्र आरक्षण हेच ध्येय नाही तर ते एक साधन आहे. महिलांच्या मानवी अधिकारांचे संरक्षण झाले पाहिजे, जागतिकीकरणाच्या आजच्या युगात सर्वच क्षेत्रात महिलांचे प्रमाण 50 टक्के हवे यादिशेने समाजाकडून एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे असं आवाहन शिवसेना प्रवक्ता नीलम गो-हे यांनी केलं.
असंघटीत क्षेत्रात महिलांचे प्रमाण 60% हून अधिक असून आरक्षणात सर्वसाधारण महिलांनाही प्राधान्य हवे. राजकीय क्षेत्रात अधिक महिलांनी प्रवेश केला पाहिजे,”असे प्रतिपादन गो-हे यांनी केले.
मेहता पब्लिशिंग हाउस फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणा-या “रुचिराकार कमलाबाई ओगले”पुरस्कार वितरण समारंभात अध्यक्षस्थानी त्या बोलत होत्या. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक,फौंडेशनचे अध्यक्ष सुनील मेहता,प्रसन्न ओगले.व सत्कारार्थी सुवर्णा तळेकर,भारतबाई देवकर,व अर्चना जतकर,आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक उपस्थित होते.
पुण्यात टिळक रस्ता परिसरातील आय एम एच्या डॉ. नीतू मांडके सभागृह येथे झालेल्या या समारंभात शरयू दाते,चिन्मयी गोस्वामी ऐश्वर्या सावंत या मुलींचा “यंग अचिव्हर्स”पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शाल श्रीफळ,स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.या प्रसंगी बोलताना मुक्ताताई टिळक यांनी भारतातच नव्हे तर विकसित देशातील महिला राजकारण्यांना ही लैंगिक भेदभावाचा सामना करावा लागतो.भारतात महिलांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.