२०५ रिक्षा वाढवणार कोंडी
By admin | Published: April 5, 2017 03:57 AM2017-04-05T03:57:51+5:302017-04-05T03:57:51+5:30
कल्याण आरटीओ कार्यालयाकडून १५ एप्रिलच्या आत रिक्षांचे २०५ नवे परवाने दिले जाणार आहेत.
अनिकेत घमंडी,
डोंबिवली- कल्याण आरटीओ कार्यालयाकडून १५ एप्रिलच्या आत रिक्षांचे २०५ नवे परवाने दिले जाणार आहेत. आरटीओ हद्दीतील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा या शहरांमध्ये आधीच वाहतुकीच्या नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. त्यातच या नवीन रिक्षांची भर पडणार असल्याने कोंडी आणखी वाढणार आहे. डोंबिवलीत अंदाजे १०० रिक्षा वाढणार असल्याने नवीन परवाने देऊ नयेत, असा पवित्रा डोंबिवलीकरांनी घेतला आहे. शहर वाहतूक नियंत्रण विभाग व कल्याण आरटीओकडे त्यांनी तशी मागणी केली आहे.
डोंबिवली पूर्वेतील रामनगर आणि राजाजी पथ परिसरातील रहिवासी वाढत्या कोडींमुळे बेजार झाले आहेत. वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी त्यांनी वाहतूक विभागाकडे लावून धरली आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून आता त्यांनी रिक्षांच्या नवीन परवान्यांच्या वितरणाबाबत जागृती सुरू केली आहे. नवीन परवाने देऊन शहराची कोंडी आणखी वाढवू नये, वाहनतळ, पार्किंगची व्यवस्था, एकेरी मार्ग, दुचाकीचे मार्ग, अवजड वाहनांना गर्दीच्या वेळेत शहरात प्रवेशबंदी, अशा विविध नियमांची अंमलबजावणी आवश्यक आहे. शहरातील कोंडीचे नियोजन महत्त्वाचे आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी रेल्वेस्थानक परिसरात होणारी कोंडी कमी व्हावी, यासाठी होमगार्ड आणि वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
रिक्षाचालकांमुळे कोंडी होत असल्याने त्यांना शिस्त लावणे, स्थानक परिसरातील बेकायदा रिक्षा स्टॅण्ड रद्द करून एकच मुख्य स्टॅण्ड सुरू करणे. त्यासाठी रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेणे, नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत संकेत देण्याची मागणी रामनगर आणि राजाजी पथ परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
कल्याण आरटीओ हद्दीत अधिकृत २० हजार रिक्षा आहेत. त्यापैकी १८ हजार सीएनजी, ५०० एलपीजी तर उर्वरित पेट्रोल आणि डिझेल धावत आहेत. बेकायदा रिक्षांचीही संख्या हजारोंच्या घरात आहे. अशा रिक्षांवर सातत्याने कारवाई करणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि या बाबींवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर शहरांच्या गरजेनुसार नवीन रिक्षांना आरटीओने परवानगी द्यावी, अशी डोंबिवलीकरांची अपेक्षा आहे. पण आधीच कोंडीमुळे कंबरडे मोडलेल्या शहराला आणखी विस्कळीत का करता, असा सवाल त्यांनी केला आहे.
हिंदी भाषिकांना परवाने न देण्यासंदर्भात उच्च न्यायालयात असलेल्या याचिकेचा निकाल नुकताच लागला आहे. त्यातील कल्याण आरटीओअंतर्गत २०५ परवाने देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ते १५ एप्रिलपर्यंत देण्याच्या सूचना आहेत.
- नंदकिशोर नाईक,
उपप्रादेशिक अधिकारी, कल्याण