२०५०पर्यंत जागतिक तापमानात ४ टक्के वाढ
By admin | Published: July 14, 2015 01:31 AM2015-07-14T01:31:57+5:302015-07-14T01:31:57+5:30
वातावरणात होत असलेल्या बदलांचा वेग लक्षात घेता २०५०पर्यंत जागतिक पातळीवर तापमानात सरासरी ४ टक्क्यांची वाढ अपेक्षित असून, धक्कादायक गोष्ट म्हणजे,
मुंबई : वातावरणात होत असलेल्या बदलांचा वेग लक्षात घेता २०५०पर्यंत जागतिक पातळीवर तापमानात सरासरी ४ टक्क्यांची वाढ अपेक्षित असून, धक्कादायक गोष्ट म्हणजे, भारतासह चीन आणि अमेरिकेतील काही भागांत तापमानाचे हेच प्रमाण ७ टक्क्यांपर्यंत वाढण्याची भीती ‘कौन्सिल आॅन एनर्जी, एन्व्हायरमेंट अॅण्ड वॉटर’ने वर्तविली आहे. ब्रिटनच्या परदेशी विभागातर्फे वातावरणीय बदल, त्याचा विशिष्ट भूभागावर होणारा परिणाम आणि त्या अनुषंगाने करावे लागणारे अपेक्षित बदल यांचा एक सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे अनेक संभाव्य धोके उजेडात आले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या शतकात जितक्या झपाट्याने बदल झाले नाहीत तितक्या झपाट्याने चालू शतकात बदल होतील, असे भाकीत वर्तविण्यात आले आहेत.
राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. रामादुराई यांच्या हस्ते या अहवालाचे प्रकाशन झाले. वातावरणातील बदल, त्याचे राजकीय परिणाम या अनुषंगाने झालेला हा आजवरचा पहिलाच अहवाल आहे. या अहवालानुसार, वातावरणात होत असलेल्या या बदलांचा सर्वाधिक फटका हा जागतिक पातळीवर ज्या अर्थव्यवस्थांचा दबदबा आहे, अशा देशांनाच प्रामुख्याने बसेल, असे चित्र आहे. त्यामुळे या देशांना २०५०पर्यंत त्यांच्या दैनंदिन शैली आणि व्यवस्थेत आमूलाग्र बदल करावे लागणार आहेत. हे बदल न केल्यास त्याची आर्थिक आणि सामाजिक अशी मोठी किंमत चुकवावी लागते.