मालवाहू बसमुळे एसटीला २१ लाखांचे उत्पन्न; आतापर्यंत धावल्या ५४३ फेऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 07:15 AM2020-06-13T07:15:30+5:302020-06-13T07:15:53+5:30
आतापर्यंत तीन हजार टन मालाची वाहतूक
मुंबई : मागील अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ तोट्यात आहे. संचित तोटा ६ हजार कोटी रुपयांपेक्षा वाढला आहे. लॉकडाऊनमुळे एसटीच्या उत्पन्नाची गाडी अधिकच तोट्यात रुतली आहे. यातून बाहेर येण्यासाठी महामंडळाने मालवाहतुकीकडे लक्ष केंद्रित केले असून, आतापर्यंत राज्यभरात एसटीच्या मालवाहू बसच्या ५४३ फेºया झाल्या आहेत. याद्वारे ३ हजार टन मालाची वाहतूक करण्यात आली असून, यातून २१ लाखांचा महसूल मिळाला.
एसटी महामंडळाच्या आदेशानुसार, राज्यातील ३१ विभागांमध्ये १० वर्षांचे आयुर्मान झालेल्या आणि ६.५० लाख किमी धावलेल्या प्रत्येकी १० प्रवासी बसचे रूपांतर मालवाहतूक वाहनात करण्यात येत आहे. आतापर्यंत ७२ बस मालवाहतुकीसाठी तयार झाल्या आहेत. महामंडळाच्या ताफ्यात ३०० मालवाहतूक बस (ट्रकमध्ये रूपांतरित) आधीच होत्या. आता एकूण ३७२ बस मालवाहतुकीसाठी उपलब्ध आहेत. २१ मेपासून आतापर्यंत ३ हजार टन मालाची वाहतूक करण्यात आली.