विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासाठी २१ हजार कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 05:59 AM2018-10-21T05:59:10+5:302018-10-21T05:59:13+5:30
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी २१ हजार २२२ कोटी रुपये खर्चाच्या विशेष कार्यक्रमाची घोषणा राज्य शासनाने शनिवारी केली.
मुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी २१ हजार २२२ कोटी रुपये खर्चाच्या विशेष कार्यक्रमाची घोषणा राज्य शासनाने शनिवारी केली. त्या अंतर्गत पूर्ण करावयाच्या योजनांची यादीही नियोजन विभागाने जाहीर केली आहे. त्यात ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शेतीसाठी पूरक व्यवसाय उपलब्ध करून देणे, रोजगार निर्मितीविषयक कार्यक्रम हाती घेणे, सिंचन क्षमतेत वाढ करणे, पर्यटनास चालना देणे, तसेच शैक्षणिक व आरोग्यविषयक सुविधा निर्माण करणे यावर विशेष भर देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात २० जुलै, २०१८ रोजी या कार्यक्रमाची घोषणा केली होती.
कामांचा आढावा घेण्याची जबाबदारी वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातीेल ८३ लघुपाटबंधारे प्रकल्प, तसेच सहा मध्यम व मोठे प्रकल्प असे एकूण ८९ प्रकल्प नजीकच्या काळात पूर्ण करण्यासाठी १३ हजार ४२२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
>वर्धा जिल्ह्यात शेतमाल विक्रीसाठी ‘रुरल मॉल’ सुरू करणार
वाशिम जिल्ह्यात अॅग्रो मॉल आणि अॅग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रियल हब उभारणार.
गोंदियात पलाश हे ३०० महिला बचत गटांचा सहभाग असलेले विक्री केंद्र सुरू होणार.
वसंतराव नाईक मराठवाडा, तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासाठी प्रत्येकी ५० कोटी
नागपुरात डिफेन्स, एयरोस्पेस क्लस्टर उभारणीसाठी ५ कोटी
सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी २५ कोटी
औरंगाबाद व नागपुरात शासकीय योजनांची माहिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व त्यांच्यामार्फत कुटुंबीयांना देण्यासाठी ‘कॉलेज-नॉलेज-व्हिलेज’
आयटीआयच्या विस्तारासाठी २७ कोटी ५० लाख रुपये खर्चून क्षमता वाढविणार.
उद्योगांना आणखी २ वर्षे वीजदर सवलत
नाशिकच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी ३५ कोटी
उत्तर महाराष्ट्राला पर्यटन विकासासाठी ३८ कोटी तर मराठवाड्यासाठी ८४ कोटी