२१ हजार शेततळे अद्याप कागदावरच
By admin | Published: July 12, 2017 04:27 AM2017-07-12T04:27:12+5:302017-07-12T04:27:12+5:30
सरकारची योजना मागेल त्याला शेततळे, अशी असली तरी जिल्ह्यातील २१ हजार शेततळे अद्याप कागदावर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली
अण्णा नवथर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : सरकारची योजना मागेल त्याला शेततळे, अशी असली तरी जिल्ह्यातील २१ हजार शेततळे अद्याप कागदावर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे़ गेल्या दीड वर्षांत ४ हजार शेततळे खोदून झाले असून, पाचशे शेतकऱ्यांना अद्याप अनुदानच मिळालेले नाही़ प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यात या योजनेला ‘कोरड’ पडली आहे़
जलयुक्त शिवार अभियानापाठोपाठ राज्य सरकारने मागेल त्याला शेततळे, योजना जाहीर केली़ फेबु्रवारी २०१६ मध्ये ही योजना जिल्ह्यात सुरू झाली़ शेततळ्यासाठी ५० हजार रुपयांचे अनुदान, असे योजनेचे स्वरूप आहे़ पहिल्यावर्षी नगर जिल्ह्यासाठी ८५०० शेततळ्यांचे उदिष्ट्य होते़ क्षेत्रफळाच्या तुलनेत उदिष्ट्ये कमी होते़ यंदा त्यात ७०० शेतततळ्यांची सरकारने वाढ केली़ अर्ज केल्यानंतर शेततळ्यासाठी ५० हजारांचे अनुदान मिळेल, या आशेने जिल्ह्यातील २५ हजार ९४ शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज केले़ त्यापैकी २३ हजार ८९ शेतकऱ्यांनी सेवा शुल्कही भरले़ मात्र १४ हजार २९८ अर्जांनीच मंजुरीचा ठप्पा गाठला़
तालुकास्तरीय समितीने हिरवा कंदील दाखविलेल्यांपैकी ११ हजार शेततळ्यांचा कार्यरंभ आदेशही दिला गेला़ परंतु, त्यापैकी ८९६ शेततळ्यांची कामे सुरू झाली असून, गेल्या दीड वर्षांत फक्त ४३६६ शेततळे पूर्ण झाले असून, त्यात पाणी साचले आहे़