टँकरवर २१२ कोटींचा खर्च !
By admin | Published: July 19, 2016 04:47 AM2016-07-19T04:47:27+5:302016-07-19T04:47:27+5:30
यंदा उन्हाळ्यात राज्यातील नागरिकांना पेयजल पुरविण्यासाठी तब्बल २१२ कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत.
प्रदीप भाकरे,
अमरावती- यंदा उन्हाळ्यात राज्यातील नागरिकांना पेयजल पुरविण्यासाठी तब्बल २१२ कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत. त्यातील जवळपास ९० कोटी रुपये टँकरवारीवर खर्च झाले. तर, ५० कोटींमधून नळ योजनांची विशेष दुरुस्ती करण्यात आली.
यावर्षीचा उन्हाळा राज्याला ‘दुष्काळदाह’ देऊन गेला. ग्रामीण व नागरी भागातील पिण्याच्या पाणीटंचाई निवारणार्थ राज्यभरात विविध उपाययोजना राबविण्यात आल्यात. अमरावती, नागपूर, नाशिक, कोकण व औरंगाबाद या विभागात पाणीटंचाई निवारणार्थ राबविलेल्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासाठी शासनाने २१२ कोटी २९ लक्ष रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यातील ८९.२० कोटींचा निधी टँकरने पाणीपुरवठा करण्यावर खर्च झाला आहे. राज्यातील सहाही विभागांत मोठ्या प्रमाणात टँकरने पेयजलाचा पुरवठा करण्यात आला.
राज्यात नोव्हेंबर ते जुलैच्या मध्यावधीपर्यंत १० हजारांपेक्षा अधिक गाव वस्त्यांमध्ये १२ हजार टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. त्यात मराठवाड्यात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. ८९ कोटींच्या टँकरवारीमध्ये ५७.१८ कोटी औरंगाबाद विभागावर खर्च करण्यात आले. नाशिक विभागात २४.७६ कोटी तर अमरावती विभागात ६.५० कोटी रुपये खर्च झाला.
<जीपीएस प्रणाली आवश्यक
ज्या टँकरवर जीपीएस प्रणाली बसविली आहे, त्या टँकरच्या फेऱ्यांची नोंद करण्यात आली. अशा टँकर वाहतूकधारकांनाच देयके दिली जातील. पाणीपुरवठा करणाऱ्या ज्या टँकरवर जीपीएस प्रणाली बसविलेली नाही किंवा जीपीएस प्रणाली बंद असेल अशा फेऱ्या बनावट ठरणार आहेत. अशा बनावट फेऱ्यांसाठी देयके दिली जाऊ नये, असे निर्देश पाणीपुरवठा स्वच्छता विभागाने दिले आहेत.