देहू, आळंदी, पंढरपूरला २१२ कोटीचे अर्थसहाय्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 05:12 AM2018-08-25T05:12:01+5:302018-08-25T05:13:22+5:30
देहू, आळंदी, पंढरपूरच्या विकासासाठी १ हजार ९४ कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी ७४५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
मुंबई : देहू, आळंदी व पंढरपूर या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी २१२ कोटी रुपये तर सेवाग्रामच्या (जि.वर्धा) १७ कोटी रुपये यंदा देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एका बैठकीत सांगितले.
देहू, आळंदी, पंढरपूरच्या विकासासाठी १ हजार ९४ कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी ७४५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. त्यातील ७११ कोटी रुपयांची कामे झालेली आहेत. यावर्षी नव्याने २१२ कोटी रुपये देऊन विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री विजय शिवतारे, विजय देशमुख आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
सेवाग्राम, पवनार, वरुड या स्थळांचा पूर्ण विकास करण्यासाठी एकूण १७० कोटींचा आराखडा मांडण्यात आला आहे. तेथे रस्ते निर्माण, मलनि:स्सारण, धाम नदीवर घाट निर्माण, सौरऊर्जा, सुशोभीकरण आदी कामांसाठी नव्याने अतिरिक्त १७ कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला. सेवाग्राम येथे सुशोभीकरण कामासाठी जे जे आर्ट्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार असून याठिकाणी चरखा म्युझियम करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.