आदिवासींना डासमुक्त झोप, २.१९ लाख मच्छरदाण्या : टास्कफोर्सचा पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 02:53 AM2017-11-17T02:53:19+5:302017-11-17T02:53:40+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवताप (मलेरिया) निर्मूलनासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या टास्कफोर्सने केलेल्या पाठपुराव्यानंतर आता आदिवासींसाठी तब्बल २ लाख १९ हजार मच्छरदाण्यांचे वाटप राज्यातील आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना सुरू करण्यात आले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवताप (मलेरिया) निर्मूलनासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या टास्कफोर्सने केलेल्या पाठपुराव्यानंतर आता आदिवासींसाठी तब्बल २ लाख १९ हजार मच्छरदाण्यांचे वाटप राज्यातील आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना सुरू करण्यात आले आहे.
एका मच्छरदाणीची किंमत ५०० रुपये असून तिच्यावर डास बसल्यानंतर तो मरतो. त्यामुळे एकप्रकारे डास निर्मूलनदेखील होणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात १ लाख १९ हजार, चंद्रपूर - २३ हजार, गोंदिया २० हजार, ठाणे १० हजार, पालघर १० हजार, रायगट २० हजार, सिंधुदुर्ग ७ हजार आणि नंदुरबार १० हजार मच्छरदाण्यांचे वाटप सध्या सुरू आहे. एका कुटुंबातील दोन जणांमागे एक मच्छरदाणी दिली जाते. हिवतापाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या गावांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या टास्क फोर्सने
अशा मच्छरदाण्यांच्या वाटपाचा आग्रह धरला होता. त्यामुळे गेल्या काही वर्षांत झाले नाही इतके मोठे मच्छरदाण्यांचे वाटप हिवताप निर्मूलन कार्यक्रमांतर्गत आता केले जात आहे.
मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र -
राज्य मोतीबिंदूमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असून येत्या २० महिन्यांत १७ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या योजनेचे मुख्य समन्वयक म्हणून सुप्रसिद्ध नेत्रशल्यचिकित्सक व राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयातील सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांची नियुक्ती मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.