राज्यात दिवसभरात आढळले कोरोनाचे २१,९०७ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 06:28 AM2020-09-20T06:28:37+5:302020-09-20T06:28:54+5:30
४२५ मृत्यू; साडे आठ लाखांहून अधिक रुग्ण झाले बरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात दिवसभरात कोरोनाच्या २१ हजार ९०७ रुग्णांची नोंद तर ४२५ मृत्यू झाले. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११ लाख ८८ हजार १५ झाली असून, बळींची संख्या ३२ हजार २१६ झाली आहे.
राज्यात सध्या २ लाख ९७ हजार ४८० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.२२ टक्के असून, मृत्युदर २.७१ टक्के आहे. शनिवारी दिवसभरात नोंदविण्यात आलेल्या ४२५ मृत्युंपैकी २५५ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर १२२ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४८ मृत्यू हे एक आठवड्याभरापूर्वीचे आहेत.
राज्यात दिवसभरात २३,५०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर राज्यात आतापर्यंत ८ लाख ५७ हजार ९३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. दिवसभरातील ४२५ मृत्युंपैकी मुंबई ५०, ठाणे १७, ठाणे मनपा १, नवी मुंबई मनपा ८, कल्याण डोंबिवली मनपा १, उल्हासनगर मनपा १, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा-भार्इंदर मनपा ८, पालघर ३, वसई विरार मनपा ७, रायगड १५, पनवेल मनपा १, नाशिक १, नाशिक मनपा ६, मालेगाव मनपा १, अहमदनगर ८, अहमदनगर मनपा ३, धुळे मनपा १, जळगाव ७, जळगाव मनपा २, नंदूरबार २, पुणे १२, पुणे मनपा ३९, पिंपरी-चिंचवड मनपा ४, सोलापूर १६, सातारा २६, कोल्हापूर २०, कोल्हापूर मनपा ५, सांगली १७, सांगली-मिरज- कुपवाड मनपा ९, सिंधुदुर्ग ३, रत्नागिरी ४, औरंगाबाद ७, औरंगाबाद मनपा ७, नागपूर १४, नागपूर मनपा २२, वर्धा ३ आदी रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान राज्याचे माजी अर्थमंत्री तथा बल्लारपूरचे (चंद्रपूर) आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. याबाबत मुनगंटीवार यांनी फेसबूक व टिष्ट्वटरवर याची माहिती दिली असून प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे.
मुंबईत ३०,६३९ सक्रिय रुग्ण
मुंबईत शनिवारी कोरोनाचे २ हजार २११ रुग्ण आढळून आले, तर ५० मृत्यू झाले. शहर, उपनगरात कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ८२ हजार २०३ वर पोहोचली असून, एकूण मृत्यू ८ हजार ४२५ झाले. आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ३० हजार ६३९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ७८.४ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ५६ दिवस आहे.
मुंबईत कोरोना संसर्ग वाढू लागल्याने प्रशासन, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रत्येक गल्लीत, भाजी मार्केटमध्येही तपासणी, जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. माहीम कापड बाजार येथील हे दृश्य.