२१वे शतक हे बुद्धिमत्तेचे
By admin | Published: May 21, 2015 12:35 AM2015-05-21T00:35:51+5:302015-05-21T00:45:06+5:30
डी. बी. शेकटकर : भारतीय सैन्य सुसज्ज, सामर्थ्यशाली
इचलकरंजी : आपल्या देशाच्या आणि जागतिक पातळीवर पाहिले, तर १९ वे शतक हे मसल पॉवरचे होते. २० वे शतक हे मनी पॉवरचे, तर आजचे २१ वे शतक हे नॉलेज पॉवरचे आणि बुद्धिमत्तेचे आहे. आमचा युवावर्ग जितका बुद्धिवान होईल, तितका तो संपन्न होऊ शकेल, असे उद्गार निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर यांनी काढले.
एकविसाव्या शतकातील ‘आतंकवाद’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, केवळ आतंकवादी संपवून उपयोग नाही, तर आतंकवाद संपायला हवा, तरच जगात अधिक शांतता प्रस्थापित होईल. आतंकवाद थांबविण्यासाठी प्रत्येक घरात, समाजात जागरूकता हवी. घराघरांत मानवतावाद आणि नीतिमूल्यांची जपणूक होणे आवश्यक आहे, असे झाले तरच विद्यार्थी आणि युवक वर्ग वाईट मार्गाकडे वळणार नाही. येथील मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत त्यांनी विचार मांडले.
आपल्या भाषणात पाकिस्तान व चीनबद्दल बोलताना त्यांनी, पाकिस्तान शस्त्र सज्जतेत आपल्यापेक्षा कमी असल्याने आपल्यावर आतंकवाद थोपवत आहे; पण त्यांच्या प्रत्येक प्रांतात अंतर्गत वाद असल्याने प्रचंड हिंसाचार आहे आणि त्याची फळे त्यांना भोगावी लागत आहेत. चीन आज विकसित असला, तरी तिथेही मोठी विषमता आहे. त्यांनाही आतंकवादाची समस्या आहे. चीन युद्ध करून आपला भूभाग बळकाऊ शकणार नाही आणि आपले सैन्यही तसे होऊ देणार नाही, असे उद्गार त्यांनी काढले.
आपल्या भाषणात छत्रपती शिवरायांचा महान युद्ध नेतृत्व, असा गौरवपर उल्लेख शेकटकर यांनी केला. आपले सैन्य पूर्णपणे सक्षम असून, जगातील २९ देशांत आज भारतीय सैन्य शांततेसाठी कार्य करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. मनोरंजन मंडळाचे दिनेश कुलकर्णी आणि यतिराज भंडारी यांनी स्वागत केले. प्रा. समीर गावंडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)