नरखेड मार्गावर मालगाडीचे २२ डबे घसरले; सुदैवाने जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 03:46 PM2021-08-15T15:46:34+5:302021-08-15T15:48:23+5:30
Railway Accident in Narkhed: अमरावती ते नरखेड रेल्वे मार्गावरील वलगाव नजीकच्या शिराळा येथे कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे २२ डबे घसरल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
अमरावती : अमरावती ते नरखेड रेल्वे मार्गावरील वलगाव नजीकच्या शिराळा येथे कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे २२ डबे घसरल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. रेल्वे रुळाचे चाव्या (फिश प्लेट) काढण्यात आल्याने हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
बल्लारशा येथून अमरावती जिल्ह्यातील डवरगाव येथील सोफिया औषनिक वीज निर्मिती प्रकल्पात कोळसा मालगाडीने नेला जात होता. मालगाडीचे एकूण २९ डबे होते. मात्र, वलगाव ओलांडताच शिराळा येथे अचानक मालगाडीचे २२ डबे रुळाखालून घसरले. मालगाडीचे चालक सुद्धा हैराण झाले. नरखेड रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यासाठी ८ ते १० तास लागणार आहे. अकोला येथून मालगाडीचे डबे उचलण्यासाठी क्रेन मागविण्यात आली आहे. बडनेरा, अमरावती येथील रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. नरखेड मार्गावर मालगाडीचे डबे घसरल्याने रविवारी नरखेड- काचीगुडा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तर, या मार्गावरून धावणारी जयपूर ते सिकंदराबाद एक्स्प्रेस दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे. मालगाडीचे डबे घसरल्याने मालहानी झाली अन्यथा,नरखेड - काचीगडा एक्स्प्रेस घसरली असती तर स्वातत्र्यदिनाच्या दिवशी मोठी जीवितहानी झाली असती, असे प्रत्यक्षदर्शीनीचे म्हणणे आहे.
रेल्वे सुरक्षा बलाची गस्त नाही
अमरावती - नरखेड रेल्वे मार्गावर सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाने नियमित गस्त करणे अनिवार्य आहे. मात्र, एक किमी अंतरापर्यंत रुळाच्या चाव्या चोरीस जात असताना ते सुरक्षा बलाच्या जवानांना दिसू नये, याचे आश्चर्य आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बला च्या जवानांची गस्त कागदोपत्री असल्याचे चित्र आहे. रुळाच्या तपासणीची जबाबदारी असलेल्या गँग मनला देखील चाव्या चोरीस गेल्या असताना दिसल्या नाहीत. परिणामी रेल्वे प्रशासनाने नरखेड मार्ग वाऱ्यावर सोडून प्रवाशाच्या जीविताशी खेळ चालविल्याचे वास्तव आहे.