सोलापुरात २२ रुग्णालयात आढळले ५२ डेंग्यू संशयित रुग्ण
By admin | Published: September 19, 2016 10:21 PM2016-09-19T22:21:32+5:302016-09-19T22:21:32+5:30
शहरातील चार मोठी रुग्णालये वगळता इतर २२ रुग्णालयांत डेंग्यू संशयित ५२ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात मिळाली आहे
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. १९ : शहरातील चार मोठी रुग्णालये वगळता इतर २२ रुग्णालयांत डेंग्यू संशयित ५२ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात मिळाली आहे, अशी माहिती आयुक्त विजयकुमार काळम यांनी दिली. डेंग्यूच्या साथ निर्मूलनासाठी डास मारण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, चार दिवसांचे मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले आहे.
डेंग्यूच्या साथीवरून महापालिकेच्या सभेत हंगामा झाला होता.
साथीबाबत आरोग्य विभागाने सादर केलेल्या आकडेवारीवर नगरसेवकांचा आक्षेप होता. नगरसेवकांनी शहरात कोठे कोठे रुग्ण आढळत आहेत, याचा पोलखेल केला होता. त्यावर आयुक्त विजयकुमार काळम यांनी रविवारी आरोग्य विभाग व झोन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व रुग्णालयांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. सुटीमुळे शासकीय रुग्णालय, अश्विनी, यशोधरा, मार्कंडेय या चार मोठ्या रुग्णालयांची यादी मिळाली नाही.
पण इतर २२ रुग्णालयांची आकडेवारी तपासल्यावर १४४ फिव्हरच्या रुग्णांपैकी ५२ रुग्ण डेंग्यू संशयित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे डेंग्यूच्या निर्मूलनासाठी कीटकनाशक फवारणी व धुराळणीसाठी मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले असून, २४ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण शहर पिंजून काढण्यात येणार आहे. त्यानंतर २६ सप्टेंबरपासून दुसरा टप्पा घेण्यात येणार आहे. आजपासून ही मोहीम सुरू करण्यात आली असून, स्वत: आयुक्त काळम यांनी एसटी डेपो, प्रभाकर महाराज वस्ती, राजस्वनगर, आदित्यनगर, बंजारा सोसायटी, विजापूर रोड, जयभवानी बाग, होम मैदान येथील मोहिमेच्या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केल्याचे सांगितले.
१७२ कर्मचाऱ्यांचे पथक
शहरातील आठ झोनसाठी कीटकनाशक फवारणीसाठी ३१ व धुराळणीसाठी २२ पथके कार्यरत करण्यात आली आहेत. दररोज सकाळी साडेसात ते दुपारी बारा वाजेपर्यंत फवारणीचे काम चालेल. डेंग्यूचा डास या काळात आराम करीत असतो. नेमकी हीच वेळ साधून हे काम उरकण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी कर्मचारी प्रत्येक घरोघरी जाऊन डास उत्पत्तीबाबत जनजागरण करणार आहेत. धुराळणी सकाळी ६ ते ८ व सायंकाळी ६ ते ८ या वेळेत करण्यात येणार आहे. या पथकावर निगराणी ठेवण्यासाठी आयुक्तांसह १५ वरिष्ठ अधिकारी कार्यरत ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक झोन वॉर्ड, नगरसेवक व कर्मचारी कोण कोण आहेत, याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
पाच लाखांचे कीटकनाशक खरेदी
सोमवारी तातडीने पुण्याहून पाच लाखांचे कीटकनाशक खरेदी करण्यात आले आहे. महापालिकेकडे एक महिना पुरेल इतपत साठा होता. पण आता शहरात मोहीम घेण्यात येणार असल्याने कीटकनाशकाची गरज वाढणार आहे. फवारणीचे काम वेगात होण्यासाठी दोन ट्रॅक्टरचा वापर करण्यात येत आहे. ट्रॅक्टर आणखी वाढविण्यात येणार असून, याद्वारे शाळा, मंदिरे, मैदान, बागा, बस व रेल्वे स्थानक, नाले, गटारीत कीटकनाशक फवारणी करण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या चार संघटना व जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवकांची या कामासाठी मदत मागण्यात आली आहे.
दवाखान्यांची दररोज तपासणी
खासगी दवाखान्यांत दररोज नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची चौकशी करण्यासाठी २0 डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे डॉक्टर दवाखाने व लॅबमध्ये जाऊन संशयितांचे अहवाल तपासून पाहणार आहेत. संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने मनपाच्या पथकास उपलब्ध करावेत. हे नमुने एनआयव्हीकडे पाठविले जातील, असे आयुक्त काळम यांनी सांगितले. मनपाच्या शाळांमधील शिक्षकांनाही मोहिमेत सहभागी करण्यात आले असून, विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. संशयित रुग्णास उपचारासाठी मदत हवी असल्यास नियंत्रण कक्षाच्या २३२३७00 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.