फायनान्सकडून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने नाशिकच्या इसमाची २२ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 04:53 PM2018-02-07T16:53:42+5:302018-02-07T17:02:48+5:30
नाशिक : फायनान्स कंपनीकडून ३५ कोटी रुपये कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने प्रोसेसिंग फीच्या नावाखाली मुंबईतील तरुणीने सिडकोतील इसमाची तब्बल २२ लाख रुपयांची फसवूणक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी भांडूप येथील शितल मनोहर निकम (रा़सी १२०४, महिंद्र स्प्लेंडर, मेट्रो मॉलचे समोर,भांडूप (प),मुंबई) विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

मच्छिंद्र मोतीराम शेवाळे (रा़अमराई बंगला, प्लॉट नंबर ९, बालमुक्तांगण शाळेजवळ, वृंदावननगर, कामटवाडे) यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे मित्र प्रल्हाद भालेराव यांनी मुंबईतील संशयित शीतल निकम या तरुणीकडून कर्ज घेतल्याची माहिती मिळाली़ शेवाळे यांनी या तरुणीशी संपर्क केल्यानंतर ती नाशिकला भेटण्यासाठी आली व फायनान्समार्फत ३५ कोटी रुपये कर्ज मिळवून देते असे सांगितले़ मात्र, त्यासाठी प्रोसेसिंग फी म्हणून एक टक्का रक्कम अर्थात २४ लाख रुपये भरावे लागतील, असे सांगून किशोर भालेराव यांनी पूर्वी ११ लाख रुपये दिले आहेत. त्यामुळे उर्वरित रक्कम तुम्ही भरा, असे सांगितले.
त्यानंतर शेवाळे यांनी संशयित शीतल निकम हिच्या स्टेट बँक आॅफ जयपूर अॅण्ड बिकानेर शाखा नाशिक येथील खात्यात २० लाख ५८ हजार रुपये ट्रान्स्फर केले. यानंतर तुमचे प्रकरण मंजूर करते; मात्र उर्वरित पैसे भरा, असे तिने सांगितल्यावर शेवाळे यांनी पुन्हा तिच्या बँक खात्यात २ लाख १७ हजार रुपये भरले, असे त्यांनी एकूण २२ लाख ७५ हजार रुपये भरले; मात्र तरीदेखील कर्जमंजुरी लवकरात लवकर होत नसल्याने त्यांना संशय आला.
दरम्यान, शेवाळे यांनी निकम हिच्याकडे पैसे मागितले असता तिने त्यांना शिवीगाळ व दमदाटी करून २२ लाखांचा अपहार करीत फसवणूक केली.
या प्रकरणी शेवाळे यांनी अंबड पोलीस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दिली आहे़