२२ आमदारांची ‘पाटीलकी’!
By admin | Published: October 22, 2014 05:49 AM2014-10-22T05:49:15+5:302014-10-22T05:49:15+5:30
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, २२ आमदारांना ‘पाटीलकी’ ठेवण्यात यश आले आहे़
वीरकुमार पाटील, कोल्हापूर
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, २२ आमदारांना ‘पाटीलकी’ ठेवण्यात यश आले आहे़ गत विधानसभेतील हा आकडा २३ होता़ तर नव्या सभागृहात पाटील, चव्हाण, देशमुख, नाईक या आडनावांच्या आमदारांचे वर्चस्व राहणार आहे.
या आडनावांच्या निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. यात विधानसभेत ‘पाटीलकी’ करणारे सर्वाधिक २२ आमदार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसह जवळपास सर्वच निवडणुकांचे गणित हे जातिपातीच्या राजकारणावर अवलंबून राहिले आहे. त्यामुळे अमूक आडनावाचा किंवा जातीचा उमेदवार दिला, तर विशिष्ट जातीची मते मिळतील, असा अंदाज बांधला जातो. बहुतेकवेळा त्यामध्ये यशही येते. त्याशिवाय काही ठराविक आडनावांची लोकसंख्या राज्यात अधिक आहे. ही आडनावे विशिष्ट कामावरून, समाजाने दिलेल्या जबाबदारीवरून, राजेरजवाड्यांच्या काळात मिळालेल्या मानसन्मानावरून पडली आहेत. असे एकाच आडनावाचे उमेदवार अधिक संख्येने निवडून येतात. यंदाही ही परंपरा कायम राहिली असून, पाटील आडनावाचे तब्बल २२ आमदार यंदा विधानसभेत आपआपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
२००९ मध्ये अस्तित्वात आलेल्या सभागृहात पाटील आडनावाचे २३ आमदार होते. यावेळी त्यामध्ये
एकाने घट झाली आहे.
चव्हाण, देशमुख आडनावांचे प्रत्येकी आठ आमदार नूतन सभागृहात
प्रवेश करणार असून, मावळत्या सभागृहात चव्हाण आडनावाचे पाच, तर चार देशमुख आमदार होते. त्याखालोखाल नाईक आडनावाचे सात आमदार आहेत.
त्याशिवाय ठाकूर, शिंदे, कदम या आडनावांचे प्रत्येकी पाच, तर चार जगताप आडनाव असलेले आमदार आहेत.
पवार आडनावामध्ये बारामतीतून राष्ट्रवादीचे अजित पवार, कल्याण (पू.)चे भाजपाचे नरेंद्र पवार, गेवराईमधून भाजपाचे लक्ष्मण पवार यांचा समावेश आहे, तर कांबळे आडनावाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तिघांमध्ये देवळीचे काँग्रेसचे रणजित कांबळे, श्रीरामपूरमधील काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे, पुणे कँटोन्मेंटचे दिलीप कांबळे यांचा समावेश आहे.