नव्या सभागृहात २२ आमदारांची ‘पाटीलकी’
By admin | Published: October 22, 2014 11:07 PM2014-10-22T23:07:50+5:302014-10-23T00:07:58+5:30
सभागृहात पाटील, चव्हाण, देशमुख, नाईक या आडनावांच्या आमदारांचे वर्चस्व
वीरकुमार पाटील - कोल्हापूर --राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अस्तित्वात येणाऱ्या सभागृहात पाटील, चव्हाण, देशमुख, नाईक या आडनावांच्या आमदारांचे वर्चस्व राहणार आहे.
या आडनावांच्या निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. यात विधानसभेत ‘पाटीलकी’ करणारे सर्वाधिक २२ आमदार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसह जवळपास सर्वच निवडणुकांचे गणित हे जातिपातीच्या राजकारणावर अवलंबून राहिले आहे. त्यामुळे अमूक आडनावाचा किंवा जातीचा उमेदवार दिला, तर विशिष्ट जातीची मते मिळतील, असा अंदाज बांधला जातो. बहुतेकवेळा त्यामध्ये यशही येते. त्याशिवाय काही ठराविक आडनावांची लोकसंख्या राज्यात अधिक आहे. ही आडनावे विशिष्ट कामावरून, समाजाने दिलेल्या जबाबदारीवरून, राजेरजवाड्यांच्या काळात मिळालेल्या मानसन्मानावरून पडली आहेत. असे एकाच आडनावाचे उमेदवार अधिक संख्येने विधानसभेत निवडून जातात.
यंदाही हा सिलसिला कायम राहिला असून, पाटील या आडनावाचे तब्बल २२ आमदार यंदा विधानसभेत आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. २00९ मध्ये अस्तित्वात आलेल्या सभागृहात पाटील आडनावाचे २३ आमदार होते. यावेळी त्यामध्ये एकाने घट झाली आहे. चव्हाण, देशमुख आडनावांचे प्रत्येकी आठ आमदार नूतन सभागृहात विराजमान होणार आहेत.
मावळत्या सभागृहात चव्हाण आडनावाचे पाच, तर चार देशमुख आमदार होते. त्याखालोखाल
नाईक आडनावाचे सातर् $िआमदार आहेत. त्याशिवाय ठाकूर, शिंदे, कदम या आडनावांचे प्रत्येकी पाच, तर चार जगताप आडनावाचे आमदार आहेत. पवार आडनावामध्ये बारामतीतून राष्ट्रवादीचे अजित पवार, कल्याण (पू.) मधून भाजपचे नरेंद्र पवार, गेवराईमधून भाजपचे लक्ष्मण पवार या तिघांचा समावेश आहे, तर कांबळे आडनावाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तिघांमध्ये देवळीचे काँग्रेसचे रणजित कांबळे, श्रीरामपूरमधील काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे, पुणे कँटोन्मेंटचे दिलीप कांबळे यांचा समावेश आहे.
मराठा समाजात पाटील जास्त
पाटील हे आडनाव मराठा समाजात अधिक प्रमाणात असले, तरी ते बहुतेक जातींमध्ये आहे. कारण पूर्वी गावचा कारभार जो पाहत असे, त्याला पाटील म्हणत असत. साऱ्याच जातीतील घराण्यांकडे गावची पाटीलकी होती. त्याशिवाय लढाईवेळी किंवा चांगले काम केल्याची बक्षिसी म्हणून राजाकडून काही गावांची सत्ता दिली जायची.
ज्याला असे बक्षीस मिळायचे, तो त्या गावांचा देशमुख म्हणून ओळखला जायचा.
आडनाव ---आमदार ---पाटील २२ --चव्हाण ८ --देशमुख ८ --नाईक ७ --ठाकूर ५ --शिंदे ५ --कदम ५ --जगताप ४ -पवार ३ -कांबळे ३