२२ संस्थाचालक, प्राचार्यांवर शिष्यवृत्ती लाटल्याचे गुन्हे
By admin | Published: June 4, 2017 12:26 AM2017-06-04T00:26:51+5:302017-06-04T00:26:51+5:30
‘लोकमत’ने उजेडात आणलेल्या व राज्यभर गाजलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात, अखेर राज्यभरातील २२ शिक्षण संस्थांचे चालक वा प्राचार्यांविरुद्ध आता ठिकठिकाणी
- यदु जोशी । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘लोकमत’ने उजेडात आणलेल्या व राज्यभर गाजलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात, अखेर राज्यभरातील २२ शिक्षण संस्थांचे चालक वा प्राचार्यांविरुद्ध आता ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या शिक्षण संस्थांनी एकाहून एक शक्कल लढवित शासनाच्या तिजोरीची लूट केल्याचेही या निमित्ताने समोर आले आहे.
शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या चौकशीसाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. के. वेंकटेशम यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी २०१६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कृती पथक (एसआयटी) स्थापन केले होते. या एसआयटीने दिलेल्या अहवालाच्या आधारे ७२ संस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश, सामाजिक न्याय विभागाचे तत्कालीन सचिव सुरेंद्रकुमार बागडे यांनी विभागाच्या आयुक्तांना दिले होते. तथापि, त्यातील एकाही संस्थेविरुद्ध आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान, एसआयटीला शनिवारी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली.
तथापि, गेल्या आठवड्यात राज्यभर दाखल झालेले गुन्हे हे फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांच्या तक्रारींच्या आधारे दाखल केले आहेत. भादंविच्या ४६५, ४६८, ४०६, ४२०, ३४ आदी कलमान्वये फसवणूक करणे, बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक, संगनमताने गुन्हा आदी आरोप ठेवण्यात आले आहेत. आघाडी सरकारच्या काळात सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या स्कॉलरशिपमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले होते. देय नसलेली स्कॉलरशिप देणे, बनावट विद्यार्थ्यांच्या नावे स्कॉलरशिप लाटणे असे असंख्य प्रकार घडले होते.
यांच्यावर नोंदले गुन्हे
१) फेअरी लँड कॉलेज आॅफ आयटी अँड मॅनेजमेंट; भद्रावती, जि. चंद्रपूर
२) राधेय कॉलेज आॅफ टेक्निकल एज्युकेशन, बुलडाणा ३) षहादेव गायकवाड व करिअर इन्स्टिट्यूट आॅफ काम्ॅप्युटर सायन्स अँड आयटीआय, अंबाजोगाई, जि. बीड ४) ज्ञानदीप कॉलेज आॅफ आय.टी.मॅनेजमेंट, अंबाजोगाई, जि. बीड ५) सृष्टी आय. टी. अँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, केज, जि. बीड ६) अॅनिमा अॅनिमेशन अकॅडमी, नंदुरबार ७) रेड फिक्सल अकॅडमी व व्हुव अॅनिमेशन अकॅडमी, शहादा, जि. धुळे ८) तुकाराम पठारे कॉलेज, चंदननगर व रेड पिक्सल अॅनिमेशन कॉलेज, खराडी, पुणे. ९) रेड पिक्सल अॅनिमेशन कॉलेज, भुसावळ, जि. जळगांव १०) मुल कॉलेज आॅफ कॉम्प्युटर, विहीरगाव, जि. चंद्रपूर ११) सावली कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, सावली, जि. चंद्रपूर १२) एफ. झेड कॉलेज आॅफ कॉम्पुटर सायन्स अँड मॅनेजमेन्ट स्टडिज, मूल जि. चंद्रपूर
१३) गुरुसाई कॉलेज मूल, जि. चंद्रपूर १४) महात्मा गांधी कॉलेज चिमुर, जि. चंद्रपूर १५) गोंडवाना कॉलेज आॅफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट, दाताळा, चंद्रपूर. १६) स्टडी पॉइंट इन्स्टिट्यूूट, बल्लारपूर, जि. चंद्रपूर. १७) श्री छत्रपती शिवाजी कॉलेज आॅफ टेक्निकल, चंद्रपूर १८) ग्लोबस कॉलेज आॅफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, चंद्रपूर १९) स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, चंद्रपूर २०) उत्थान मल्टिपर्पज सोसायटी, चंद्रपूर २१) श्री हाजी अब्दुल सुभान भाई मल्टिपर्पज सोसायटी २२) प्राचार्य, व्यवस्थापक अॅस्पायर कॉलेज आॅफ टेक्नॉलॉजी, चंद्रपूर आणि इतर.
शिष्यवृत्ती लाटण्याच्या क्लृप्त्या
- एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला अन्य कॉलेजातही प्रवेश देण्यात आला आणि त्याच्या नावावर दोन्हीकडे स्कॉलरशिप लाटण्यात आली.
- राष्ट्रभाषा प्रचार समितीने व्यावसायिक अभ्यासक्रम चालविण्यासाठी काही संस्थांना संलग्नता दिली. हे अभ्यासक्रम २०११-१२ आणि २०१२-१३ या कालावधीतच चालविण्याचे अधिकार समितीला विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेले होते. तथापि, अनेक शिक्षण संस्थांनी त्यानंतरही हे अभ्यासक्रम चालविले आणि विद्यार्थ्यांच्या नावे कोट्यवधी रुपयांची शिष्यवृत्ती सामाजिक न्याय विभागाकडून घेत घशात घातली.
- चंद्रपूर जिल्ह्यात नोकरी करीत असलेल्या एका महिलेला, तिने प्रवेश घेतलेला नसताना विद्यार्थिनी दाखवून तिच्या नावे शिष्यवृती लाटण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या धक्कादायक तक्रारी
विद्यार्थ्यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारी अत्यंत धक्कादायक आहेत. अपाल्याला कधीही स्कॉलरशिप मिळाली नाही, जी स्कॉलरशिप आपल्या नावावर उचलली आहे, त्या अभ्यासक्रमात आपण कधीही प्रवेश घेतलेला नव्हता. कोणत्याही कागदपत्रांवर आपण सह्याच केलेल्या नसताना, आपल्या नावावर परस्पर स्कॉलरशिप उचलण्यात आली, परीक्षाच दिलेली नव्हती, नोकरीचे आमिष दाखवून संस्थेने प्रवेश दिला व स्कॉलरशिप लाटली आदी तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.