एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेत २२ लोकांचे बळी गेले आणि मुंबई पोलिसांनी माणुसकीचाही बळी घेतला!
By अतुल कुलकर्णी | Published: September 29, 2017 05:54 PM2017-09-29T17:54:02+5:302017-09-29T17:54:39+5:30
एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेत २२ लोकांचे बळी गेले. मात्र या घटनेत माणुसकीचाही बळी गेला. मुंबई पोलिसांनी त्यांच्यातल्या उरल्या सुरल्या माणुसकीला मूठमाती देऊन त्यावर स्वत:च्या पराक्रमाचा झेंडाच लावलाय.
मुंबई- एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेत २२ लोकांचे बळी गेले. मात्र या घटनेत माणुसकीचाही बळी गेला. मुंबई पोलिसांनी त्यांच्यातल्या उरल्या सुरल्या माणुसकीला मूठमाती देऊन त्यावर स्वत:च्या पराक्रमाचा झेंडाच लावलाय. जे २२ लोक मेले त्यांच्या कपाळावर १ ते २२ असे नंबर लिहिण्याचे शौर्यकाम मुंबई पोलिसांनी केले आहे. विशेष म्हणजे मृतांचे कपाळावर नंबर लिहिलेले हे फोटो पोलिसांनी रिलीज केले आहेत. जनाचीही नाही आणि मनाचीही नाही, आम्हाला लाजच उरली नाही...!
या मृतांमध्ये जर तुमचे कोणी नातेवाईक असते, कोणाची आई असती, कोणाची बहीण असती तर तुम्ही त्यांच्या कपाळावर नंबर लिहिण्याची हिंमत केली असती का ? २२ मृतदेह होते. त्यांच्या नातेवाईकांनी चेह-यावरूनही ते ओळखले असते. त्यासाठी त्यांच्या कपाळावर नंबर लिहून त्या मृतदेहांची विटंबना करण्याची हिंमत पोलिसांची झालीच कशी? ज्यांनी कोणी हे केले त्याची वर्दी तातडीने काढून घेतली पाहिजे. नियतीनेच ज्यांच्या कपाळी असा दुर्दैवी मृत्यू लिहिला त्यांच्या कपाळावर ते मेल्यावर असा नंबर लिहून विटंबना करण्याची कल्पना तरी पोलिसांच्या मनात कशी येऊ शकते.
इतके कसे आम्ही असंवेदनशील झालोय. अशा कशा आमच्या भावना बोथट झाल्या आहेत. मुंबईत माणसं किड्यामुंग्यांसारखी चिरडून मरतात आणि आम्हाला त्याचे काहीच वाटत नाही... हे सगळं अत्यंत भयंकर आहे. हा फोटो पाहिला आणि प्रचंड संताप झालाय. प्रयत्न करूनही हे लिहिण्यासाठी सभ्य शब्द सापडत नाहीत. एवढे हे सगळे टोकाचे दुर्दैवी प्रकरण आहे.
माणसांच्या जीवाची काहीच किंमत उरलेली नाही का? जे मेले त्यांचे मृतदेह जर ओळीने पांढ-या कपड्यात गुंडाळून ठेवले असते आणि त्यांचे फोटो रिलीज केले असते तर मुंबई पोलिसांच्या संवेदनशिलतेचे दर्शन घडले असते पण हे घडले नाही. वेड लागलेला माणूसच ही असली कृती करु शकतो. वेळ गेलेली नाही, चुका सुधारता येतात, आता तरी ते कपाळावरचे नंबर पुसून ते मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात द्या. झालेल्या चुकीबद्दल सपशेल दिलगीर व्यक्त करा, आणि ज्यांनी कोणी हे केले असेल त्याच्यावर कठोर कारवाई करा. एवढी तरी अपेक्षा मुंबई पोलिसांकडून करू शकतो की नाही.
दुसरी माणुसकीशून्य गोष्ट खा. किरीट सोमय्या यांनी करुन दाखवली. जे मेले त्याबद्दल बोलायचे सोडून हे महाशय म्हणाले, काँग्रेसनेच गेल्या अनेक वर्षात पूल बांधला नाही म्हणून ही घटना घडली. शिवाय जे जीवानिशी गेले त्यांना रेल्वेकडून, राज्यसरकारकडून आणि केंद्राकडून किती पैसे मदत मिळणार आहे याचा हिशोब करुन ते माध्यमांना सांगत होते. किरीट सोमय्याजी, अहो तुमचे पैसे मिळणार म्हणून का कोणी चेंगरुन मरतं का हो...! जरा तरी तारतम्य बाळगा... यापेक्षा जास्त काय सांगावे तुम्हाला...?