अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास २२ वर्षांनी शिक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 05:45 AM2018-12-23T05:45:29+5:302018-12-23T05:46:02+5:30
नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील वाड गावात एका शेतमजुराच्या ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणा-या मच्छिंद्र ऊर्फ बबडू गंगाधर सोनावणे या आरोपीस मुंबई उच्च न्यायालयाने घटनेनंतर तब्बल २२ वर्षांनी सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
मुंबई : नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील वाड गावात एका शेतमजुराच्या ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणा-या मच्छिंद्र ऊर्फ बबडू गंगाधर सोनावणे या आरोपीस मुंबई उच्च न्यायालयाने घटनेनंतर तब्बल २२ वर्षांनी सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
या आरोपीस नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते. त्याविरुद्ध राज्य सरकारने केलेले अपील मंजूर करून न्या. इंद्रजीत महंती व न्या. श्रीमती व्ही. के. जाधव यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. या खेरीज बबडू यास एक लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला. तो वसूल
झाला तर ती रक्कम बलात्कारपीडित मुलीस भरपाई म्हणून द्यावी, असाही आदेश दिला गेला. शिक्षा भोगण्यासाठी आरोपीने एक महिन्यात सत्र न्यायालयापुढे हजर व्हावे, असाही आदेश दिला गेला.
न्यायालयाने असेही निर्देश दिले की, नाशिक जिल्हा विधी सेवा समितीने ही पीडित मुलगी आज कुठे आहे याचा शोध घ्यावा आणि बलात्कारित स्त्रियांना सरकारकडून भरपाई देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने जी योजना तयार केली आहे त्यानुसार भरपाई मिळण्यासाठी तिच्याकडून अर्ज भरून घ्यावा. त्या अर्जावर सहानुभूतीने निर्णय घेतला जावा, असेही खंडपीठाने सांगितले.
या पीडित मुलीचे आई व वडील दोघेही शेतमजूर म्हणून काम करायचे. १ डिसेंंबर १९९६ रोजी तिच्या मोठ्या भावाच्या पाठीत उसण भरली म्हणून वडील त्याला घेऊन इस्पितळात गेले व आई मजुरीसाठी व लाकडे आणण्यासाठी घराबाहेर पडली. डोके खूप डोके दुखू लागले म्हणून
ही मुलगी गावातील किराणा मालाच्या दुकानात गेली व आपल्याकडे पैसे नाहीत, पण काही तरी औषध द्या, अशी तिने विनंती केली. ते दुकान बबडूच्या वडिलांचे होते व त्यावेळी दुकानावर बबडू बसला होता. दुकानाच्या मागच्या बाजूला त्यांचे घर होते. मुलगी एकटीच आहे, हे पाहून बबडूने तिच्यावर बलात्कार केला. कपडे रक्ताने माखलेल्या अवस्थेत मुलगी घरी गेली व वडील आणि आई येईपर्यंत बाहेर बसून राहिली.
न्यायालयाने दोन निष्कर्ष काढून त्यावरून संशयाचा फायदा
देत बबडूला निर्दोष ठरविले होते. एक, घटनेच्या वेळी या मुलीचे वय किमान १६ वर्षे होते व दोन, बबडूने तिच्या संमतीने तिच्याशी हे शरीरसंबंध
केले. खंडपीठाने हे दोन्ही
निष्कर्ष चुकीचे ठरवत बबडूला दोषी धरले.
दयेची विनंती केली अमान्य
हा गुन्हा करताना बबडू १९ वर्षांचा होता. त्यानंतर अपिलात एवढी वर्षे गेली आहेत. त्यामुळे शिक्षा देताना त्याला दया दाखवावी, ही विनंती अमान्य करून खंडपीठाने नमूद केले की, या घटनेला २२ वर्षे होऊन गेली असली तरी फौजदारी न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास अबाधित राहावा, यासाठी आरोपीस शक्य तेवढी शक्य शिक्षा देणे गरजेचे आहे.