२२००० वर्षांपूर्वीचे मिळाले अलंकृत शिलाश्रय
By admin | Published: August 10, 2014 01:31 AM2014-08-10T01:31:15+5:302014-08-10T01:31:15+5:30
मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतातील गाविलगडच्या टेकड्यांमध्ये आदिमानवांनी केलेले तब्बल २२६ अलंकृत ‘शिलाश्रय’ (नैसर्गिक गुफा) आढळून आले आहेत. हे शिलाश्रय २२००० वर्षे पूर्वीचे असावे, असा अंदाज आहे.
सातपुडा पर्वतात दडले होते सौंदर्य : २२६ वर कोरीव रेखाचित्रण
सुमेध वाघमारे - नागपूर
मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतातील गाविलगडच्या टेकड्यांमध्ये आदिमानवांनी केलेले तब्बल २२६ अलंकृत ‘शिलाश्रय’ (नैसर्गिक गुफा) आढळून आले आहेत. हे शिलाश्रय २२००० वर्षे पूर्वीचे असावे, असा अंदाज आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण उत्खनन शाखा-१ व प्रागैतिहासिक शाखा, नागपूर यांच्यावतीने केलेले हे सर्वेक्षण अलिकडच्या काळातील सर्वात मोठे सर्वेक्षण असल्याचे बोलले जात आहे.
बैतूल जिल्ह्यामधील आठनेर आणि मुलताई तहसील येथील टेकड्यांमध्ये प्राचीन उत्किर्ण चित्रे आणि रंगचित्रे आढळून आली आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण उत्खनन शाखा-१ नागपूरचे सहायक पुरातत्वविद् डॉ. प्रशांत सोनोने यांनी सांगितले, २०११ ते २०१४ मध्ये हे सर्वेक्षण झाले. आमच्या चमूंना २२६ अलंकृत शिलाश्रय आढळून आले.
या अलंकृत शिलाश्रयांना कुकडसादेव, अंबादेवी, तेलकन, पाट, कौसुंब गुफा, मुंगसादेव, उगम, कुंड, मेंढागड, तकिरा, गायमुख, भोरकप, आग्याडोह, घोडपेंड, सालबर्डी, पचउमरी, पचमऊ, रामगड, झुनकारी, घोडम्मा आणि लामगोंदी अशा २१ समूहांत विभागले आहे. ही नावे जवळपास गावांच्या नावावरून आणि मंदिरांच्या नावावरून ठेवण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने लाल रंगाच्या विविध छटा, हिरवा काळा आणि पांढऱ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय धारदार दगडाच्या मदतीने नैसर्गिक गुहांच्या समतल पृष्ठभागांवर कोरीव रेखाचित्रण केले आहे.
प्राण्यांच्या समूहापासून ते भूमितीय आकृत्या
पचमऊ विभागातील कुकडसादेव शिलाश्रयात बैलांच्या समूहाचे रेखाचित्रण आढळून आले. सालबर्डी येथे हरणांची शिकार करणारा घोडेस्वार, यासोबतच जंगल, युद्धाचे दृश्यही येथे कोरलेले आहे. अंबादेवी विभागातील आग्याडोह शिलाश्रयात नृत्याचे दृश्य, गायमुख शिलाश्रयात शंखलिपीतील अभिलेख आढळून आले आहेत. कुंड, अंबादेवी आणि सालबर्डी शिलाश्रयात हाताच्या पंजाची छाप, गायमुख आणि १० पायांचा ठसा प्राप्त झाला आहे. सालबर्डी, तेलकन, तकिरा, पाट, पचउमरी व अंबादेवी शिलाश्रयात स्त्रिया कोरलेल्या आहेत. कुकडसादेव शिलाश्रयात मधमाशांचे पोळ, तकिरा शिलाश्रयात मत्स्यजाळ, पक्ष्यामंध्ये मोर, बगळा, घोडेस्वारमध्ये गायमुख, घोडपेंड, झुनकारी, कुंड, घोडम्मा आणि भोरकप आढळून आले आहेत. भूमितीय आकृत्यांमध्ये चौकोन, गोलाकार आणि चाक प्राप्त झाले आहेत. मानवी आकृत्यांमध्ये एकटा माणूस व समूह दाखविला आहे. वृक्ष व फणसाच्या झाडाचे चित्रण आणि विशेष म्हणजे, हरणाच्या पोटातील आतडेही यात रेखाटले आहे.