गणेशोत्सवासाठी २,२१६ जादा बस; एसटी महामंडळाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 02:37 AM2017-07-20T02:37:06+5:302017-07-20T02:37:06+5:30
कोकण मार्गावरील गणेशोत्सव काळातील गर्दी लक्षात घेता प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीने २ हजार २१६ जादा बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोकण मार्गावरील गणेशोत्सव काळातील गर्दी लक्षात घेता प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीने २ हजार २१६ जादा बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी २०१० जादा बस सोडल्या होत्या. यंदा त्यात २०६ गाड्यांची वाढ करण्यात आली आहे.
दीड महिन्यावर आलेल्या गौरी-गणपती सणासाठी भाविकांची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. परिणामी, रेल्वेच्या गणपती विशेष फेऱ्यांचे आरक्षणदेखील फुल्ल झाले आहे. यामुळे एसटी प्रशासनाच्या जादा गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षीपेक्षा यंदा एसटी प्रशासनाने २०६ जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. संगणकीय आरक्षणातून या जादा बसचे आरक्षण महिनाभर आधी म्हणजे २२ जुलैपासून प्रवाशांना करता येणार आहे. दरम्यान, जादा बसची गु्रप बुकिंग सुरू झालेली आहे. परतीच्या प्रवासाची आरक्षण प्रक्रिया २३ जुलैपासून सुरू होणार आहे.
पावसाळ्यात कोकणातील प्रवास सुखकर होण्यासाठी महामार्गावरील मोक्याच्या ठिकाणी वाहन दुरुस्ती पथकांची (ब्रेक डाऊन व्हॅन) नेमणूक करण्यात येणार आहे. २० ते २४ आॅगस्टदरम्यान गणेशोत्सव विशेष गाड्या टप्प्याटप्प्याने चालवण्यात येणार आहेत. गाड्यांच्या नियोजनासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांच्या सोईसाठी एसटीच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपाची शौचालये उभारण्याचे आदेश संबंधिताना देण्यात आले आहेत.
प्रवाशांसाठी टोल फ्री नंबर
गणेशोत्सव काळात जादा फेऱ्यांची माहिती, आरक्षण प्रक्रिया वा अन्य माहितीसाठी प्रशासनाने १८००-२२-१२५० हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. तसेच प्रवाशांनी माहितीसाठी जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.