समीरच्या घरातून २३ मोबाईल, चाकू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2015 12:51 AM2015-09-18T00:51:07+5:302015-09-18T00:55:05+5:30

बारा तास झडती : ‘सनातन’चे प्रचार साहित्यही ताब्यात

23 mobile, knife seized from Sameer's house | समीरच्या घरातून २३ मोबाईल, चाकू जप्त

समीरच्या घरातून २३ मोबाईल, चाकू जप्त

Next

सांगली : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित समीर गायकवाडच्या सांगलीतील घरातून पोलिसांनी २३ मोबाईल हँडसेट, एक कॅमेरा, रॅम्बो लोखंडी चाकू व बँक पासबुक जप्त केले आहे. बुधवारी दुपारी १२ वाजता सुरू झालेली घरझडती रात्रीपर्यंत सुरू होती. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनी जप्त केलेला ऐवज गुरुवारी दुपारी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात दिला.
समीरचे येथील मोती चौकातील धनगर गल्लीत ‘भावेश्वरी छाया’ या नावाचे घर आहे. त्याच्या घराची झडती घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास देण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी दुपारी घराची झडती सुरू झाली होती. घरात समीरची एक बॅग मिळाली. या बॅगेत विविध कंपन्यांचे २३ मोबाईल हँडसेट, रॅम्बो लोखंडी चाकू, कॅमेरा, युनियन बँकेच्या मार्केट यार्ड शाखेतील पासबुक, बेळगावच्या श्री माता को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे बचत पासबुक आढळून आले. पोलिसांनी ते जप्त केले आहे. बँक पासबुकवर २८ जानेवारी २०१५ ते ४ एप्रिल २०१५ या काळात चारवेळा व्यवहार झाल्याच्या नोंदी आहेत.
खात्यावर केवळ ४०० रुपये आहेत. सनातन संस्थेचे प्रचार साहित्य व विविध धार्मिक पुस्तकेही सापडली आहेत. घरझडतीचे काम रात्री पूर्ण झाले. पंचनामा करून मध्यरात्री दीड वाजता पोलीस घरातून बाहेर पडले. पंचनाम्याची प्रत समीरच्या कुटुंबास देण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनी जप्त केलेला माल कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात दिला. जप्त केलेल्या एकाही मोबाईल हँडसेटमध्ये सीमकार्ड आढळून आले नाही. समीर मोबाईल दुरुस्तीचे काम करीत असल्याने एवढे मोबाईल असू शकतात. याचा तपासही केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)


मडगाव स्फोटातही चौकशी--गोव्यातील मडगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ‘सनातन’चा साधक व सांगलीत पत्रकार म्हणून काम केलेल्या मलगोंडा पाटीलचा मृत्यू झाला होता. जत तालुक्यातील काराजनगी हे मलगोंडाचे गाव.
मलगोंडाशी समीरची चांगली मैत्री होती. त्यामुळे स्फोटानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने (एनआयए) समीर गायकवाड यास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. याशिवाय हे पथक स्फोटाच्या चौकशीसाठी अनेकदा सांगली शहर व जत तालुक्यात येऊन गेले आहे.

खुनामागील मास्टरमाइंड शोधा---स्मिता पानसरे : चौैकशीबाबत मौन का..?
कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाशी संबंधित संशयित समीर गायकवाड याला पोलिसांनी पक डले आहे, ही समाधानाची बाब आहे. आता तरी या प्रकरणातील मास्टरमाइंड शोधण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. सनातन्यांच्या मास्टरमाइंडची चौकशी व्हावी, या संघटनेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी स्मिता पानसरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. सनातन्यांची चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मौन बाळगून आहेत. गायकवाड हा सनातनी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे सिद्ध झाले आहे; पण मुख्यमंत्रीच सनातनी जातकुळीतले असल्यामुळेच ते चौकशीबाबत बोलण्यास तयार नाहीत. त्यांचे हे मौन सनातन्यांच्या कृतीसाठी एकप्रकारे मूकसंमतीच आहे, अशी टीका स्मिता पानसरे यांनी गुरुवारी केली. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे खूनप्रकरणी संशयित समीर गायकवाडला पोलिसांनी मंगळवारी (दि. १५) अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी पानसरे कुटुंबीयांशी साधलेल्या संवादात स्मिता पानसरे यांनी मुख्यमंत्री आणि हिंदुत्ववादी संघटनांवर टीकेची झोड उठविली. पानसरे म्हणाल्या, पोलिसांनी संशयिताला पकडले आहे, ही समाधानाची बाब आहे. आता तरी या प्रकरणातील मास्टरमार्इंड शोधण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. मात्र, ती अजूनही दिसत नाही. गायकवाडला पकडल्यानंतरही सनातन्यांच्या मास्टरमार्इंडची चौकशी व्हावी, या संघटनेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी पुरोगामी संघटना करीत असूनही याबाबत काहीच बोलण्यास मुख्यमंत्री तयार नाहीत.
पानसरेंच्या खुनानंतर आम्ही, विशेषत: सर्व पुरोगामी संघटनांनी या खुनामागे सनातनी शक्ती असल्याचे वारंवार ठासून सांगितले होते; पण पानसरेंची हत्या ही टोल, बांधकाम कामगार संघटनेतील वाद आणि मालमत्तेच्या वादावरून झाल्याचा प्रसार करण्यात होता. पोलीसही त्याच पद्धतीने तपास करीत होते. अखेर आमचा रोख खरा ठरला आहे. पोलीस किमान संशयिताला अटक करण्यात का असेना; पण यशस्वी झाले आहेत. आता पोलिसांनी या प्रकरणातील सनातन्यांच्या मास्टरमार्इंडला शोधण्याच्या दृष्टीने राजकीय दबावाला बळी न पडता तपास करावा, अशी अपेक्षाही स्मिता पानसरे यांनी व्यक्त केली.
पानसरे म्हणाल्या, या प्रकरणात सरकारने पहिल्यापासूनच उदासीनता दाखविली आहे. या तपास प्रकरणातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या. यावेळी उमा पानसरे, अ‍ॅड. बन्सी सातपुते, सुनील जाधव, ज्योती भालकर, डॉ. मीनल जाधव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


हिंदुत्ववाद्यांनी कोणाचे हित केले ?
हिंदुत्वाचे रक्षण करण्याचा आव आणणाऱ्या हिंदुत्ववादी संघटना या मूठभरांचे हित साधत आहेत. या धर्मातील तळागाळातील लोकांची उन्नती करण्यासाठी या संघटनांनी काय केले आहे, याचा विचार आता सर्वसामान्य हिंदू नागरिकांनीच करावा, असे आवाहनही स्मिता पानसरे यांनी केले.

समीरचे दोन सख्खे मामेभाऊ ताब्यात
संकेश्वरात कारवाई
संकेश्वर : ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेतील संशयित समीर विष्णू गायकवाड याच्या संकेश्वर येथील दोन मामेभावांनाही या प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
समीर गायकवाडचे बालपण व शिक्षण संकेश्वर येथील त्याच्या आजोळी झाले आहे. त्याच्या अटकेच्या वृत्ताने संकेश्वरसह सीमाभागात मोठी खळबळ उडाली आहे.
संशयित समीर हा शिक्षणासाठी येथील सपकाळ गल्लीतील आजोळी होता. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संकेश्वरमध्ये, तर बारावी व आयटीआयपर्यंतचे शिक्षण गडहिंग्लजमध्ये झाले. शिक्षणानंतर संकेश्वर येथील गांधी चौकातील राजशेखर सायकल मार्ट दुकानालगत त्याने ‘गुरुकृपा लाईट हाऊस’ नावाचे दुकान सुरू केले होते.
दरम्यान, सात वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने तो संकेश्वरहून सांगलीला राहावयास गेला. त्याच्या दोन मावशादेखील सनातनच्या पूर्णवेळ साधक म्हणून बाहेरगावी काम करतात. त्यातूनच समीरचा सनातनशी संपर्क आला. समीरला तीन मामा व सहा मावशा असून, त्यापैकी दोन मावशा सनातनच्या पूर्णवेळ साधक म्हणून काम पाहतात. सध्या समीर हा आई शांता, भाऊ सचिन व संदीप यांच्यासह सांगलीमध्ये राहतो. त्याचा मोठा भाऊ सचिन हा रिक्षा व्यावसायिक,
तर दुसरा भाऊ संदीप याचे इलेक्ट्रीकलचे दुकान आहे. घरगुती कार्यक्रमानिमित्त त्याचे आजोळी येणे-जाणे होते. (प्रतिनिधी)

संकेश्वरच्या जाधव बंधूंकडे चौकशी
संशयित समीर गायकवाड याच्या माहितीवरून कोल्हापूर पोलिसांनी संकेश्वर येथून श्रीधर जाधव व सुशील जाधव या दोघा बंधूंना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. श्रीधर हा ‘चिक्या’ नावाने ओळखला जातो. त्याचे चुलते आजरा येथे राहत असल्याने त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण आजरा हायस्कूल येथे झाले. या दोघांना ताब्यात घेतल्याचे वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाले. याबाबत तपासप्रमुख संजयकुमार यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी संकेश्वर येथून दोघा नातेवाइकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याचे सांगितले. त्यांची नावे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

Web Title: 23 mobile, knife seized from Sameer's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.