धुळे हत्याकांडातील २३ जणांना कोठडी, राईनपाडा ग्रामस्थ झाले पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 06:03 AM2018-07-03T06:03:46+5:302018-07-03T06:04:21+5:30
साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे मुले पळविणारे समजून जमावाने पाच जणांची हत्या केल्यानंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे.
पिंपळनेर (जि. धुळे)/सोलापूर : साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे मुले पळविणारे समजून जमावाने पाच जणांची हत्या केल्यानंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे. त्यामुळे ४० ते ४५ उंबऱ्यांच्या या गावात घरांना कुलूप लावून ग्रामस्थ पसार झाल्याने गाव पूर्णपणे ओस पडले. सोमवारी अटक केलेल्या २३ आरोपींना न्यायालयाने ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली.
मृतांच्या कुटुंबांस सानुग्रह मदत व एकास शासकीय नोकरी द्या, या आश्वासनाचे लेखी पत्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. त्यानंतर मृतांच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतले. दुपारी चारनंतर ते मंगळवेढ्याकडे रवाना झाले.
फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला
मृतांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेणे, पुनर्वसनासाठी घर, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करू, अशी हमी सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. भिक्षुकांच्या हत्येनंतर नाथपंथी डवरी-गोसावी समाजाच्या सांत्वनासाठी ते मंगळवेढा येथे आले होते.
काँग्रेस संसदेत मुद्दा मांडणार
धुळ्यासहित विविध ठिकाणी जबर मारहाणीद्वारे हत्या करण्याचे जे प्रकार गेल्या काही दिवसांत घडले आहेत तो मुद्दा काँँग्रेस पक्ष संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करणार आहे.
कायदा हातात घेणे चुकीचे
मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत देण्यात येईल. पोलीस कारवाई सुरू आहे. काही लोक जाणीवपूर्वक अफवा पसरवित आहेत. त्यावर पोलीस लक्ष ठेऊन आहेत. कुणीही कायदा हाती घेणे चुकीचे आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री