शिक्षकांची २३ हजार रिक्त पदे भरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 12:07 PM2023-07-31T12:07:05+5:302023-07-31T12:07:31+5:30
यात सुमारे २ लाख ११ हजार ६३० शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे अजूनही ६४४ शाळांची संच मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे.
मुंबई : शालेय शिक्षण विभागाने नुकतीच राज्यातील शाळांची संच मान्यता पूर्ण केली आहे. त्यानंतर आता शिक्षण विभागाने शिक्षक भरतीचा कार्यक्रम जाहीर केला असून एकूण जिल्हा परिषदेच्या ५९ हजार ९९७ शाळांपैकी ५९ हजार ३५३ शाळांची संच मान्यता पूर्ण करण्यात आली आहे. यात सुमारे २ लाख ११ हजार ६३० शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे अजूनही ६४४ शाळांची संच मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्हा परिषदेच्या संचमान्यता झालेल्या शाळांवर १ लाख ८७ हजार ९१४ शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, राज्यात २३ हजार जागा रिक्त असल्या तरीही शिक्षकांच्या एकूण रिक्त जागांची संख्या संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच समोर येणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी निश्चित कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.
यंदा शिक्षण विभागाला बिंदुनामावली निश्चित करून जिल्हा परिषदांना पोर्टलवर १५ ते ३१ ऑगस्टदरम्यान जाहिराती प्रसिद्ध कराव्या लागणार आहेत. उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी १ ते १५ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली जाणार आहे.
‘आरटीई’च्या निकषांनुसार प्रत्येकी ३० मुलांमागे एक शिक्षक बंधनकारक आहे. पण मागील साडेपाच वर्षांत शिक्षक भरती न झाल्याने हा निकष डावलला गेला आहे. या पार्श्वभूमीवर एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे. पण, सध्या पहिल्या टप्प्यात पदे भरली जाणार आहेत.