2.30 लाखांची लाच
By admin | Published: June 8, 2014 01:02 AM2014-06-08T01:02:54+5:302014-06-08T01:19:39+5:30
सदर पोलीस ठाण्याचा निरीक्षक अरुण माळी व त्याचा रायटर मनोहर निमजे याला अडीच लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चमूने अटक केली.
पोलीस विभागात खळबळ : रंगेहाथ अटक
नागपूर : सदर पोलीस ठाण्याचा निरीक्षक अरुण माळी व त्याचा रायटर मनोहर निमजे याला अडीच लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चमूने अटक केली.
शकीलबाबू वल्द छोटू साहाब (४२) रा. अवस्थीनगर चौक पोलीस लाईन टाकळी मागे यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर अँण्टी करप्शन ब्युरोच्या चमूने ही कारवाई केली. शकीलबाबू हे खासगी प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करतात. त्यांनी मौजा चक्कीखापा येथे नुकताच एका शेतीचा सौदा केला होता. बापू महादेव गोरले यांच्याकडून ही शेती घेतली होती. शेतीमालकाने सात-बारा आणून दिला होता. शेती ही भूवर्ग २ ची होती. परंतु सात-बारा मात्र भूवर्ग १ चा आणून दिला होता. त्यामुळे परिसरातील काही लोकांनी रजिस्ट्रार कार्यालयामध्ये जाऊन तक्रार दाखल केली होती. त्यावर रजिस्ट्रारने सदर पोलिसांना यासंबंधी चौकशी करण्यास सांगितले होते.
त्यानुसार ७ मे २0१४ रोजी सदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण माळी यांनी शकीलबाबू यांना चौकशीसाठी बोलावून घेतले. परंतु चौकशी न करता त्यांनाच आरोपी ठरविण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘सेटलमेंट’ करण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली. परंतु शकीलबाबू यांनी आपण कुठलाही गुन्हा केला नाही. शेतीमालकाला याबद्दल विचारणा करण्यात यावी, अशी विनंती केली.
पुन्हा पैशाची मागणी
माळी मात्र काही ऐकायला तयार नव्हते. दुपारी २ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंंंंत त्यांना ठाण्यातच बसवून ठेवण्यात आले. सेटलमेंट करण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि अटक केली. दुसर्या दिवशी न्यायालयात सादर करण्यात आले. तेव्हा कोर्टाने जामीन मंजूर केला तसेच पोलिसांनाही फटकारले. त्यानंतरही माळी यांनी शकीलबाबू यांना त्रास देणे सुरूच ठेवले.
त्यांना वारंवार पोलीस ठाण्यात बोलावून विविध कागदपत्रांची मागणी केली जात होती. हा त्रास वाचवायचा असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील, असे वारंवार बजावले जात होते. या सर्वांंंंना कंटाळून शकीलबाबू यांनी अँण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दाखल केली. विभागाने प्राथमिक चौकशी केली असता प्रकरण खरे असल्याचे लक्षात आले. त्यांच्या योजनेनुसार शकीलबाबू हे शुक्रवारी पुन्हा सदर पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा माळी यांनी पुन्हा पैशाची मागणी केली.
पाच लाखाचा सौदा अडीच लाखावर ठरला. एसीबीला सूचना देण्यात आली. शनिवारी सायंकाळी ५ वाजताची वेळ ठरली. शकील हे वेळेवर पोलीस ठाण्यात पोहोचले. एसीबीची चमूही दबा धरून होती.
परंतु माळी तेव्हा बाहेर होते. फोनवर बोलणे झाले. रात्री ८.३0 वाजता माळी ठाण्यात आले. ९.३0 वाजताच्या सुमारास शकीलला आपल्या चेंबरमध्ये बोलावून घेतले. पैसे आणले का म्हणून विचारणा केली. शकील यांनी पैसे काढले. ते त्यांनी आपल्या हातात घेतले. क्षणात आपला रायटर मनोहर निमजे याला बोलावून घेतले.
शकील यांना बाहेर चहा पिण्यासाठी घेऊन जा आणि तिथेच पैसे घेण्यास सांगितले. त्यानंतर व्हीसीए स्टेडियमजवळील चहाच्या दुकानात दोघे गेले. तिथे निमजे यांनी अडीच लाख रुपये स्वीकारले.
दबा धरून बसलेल्या एसीबीच्या चमूने त्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर पोलीस निरीक्षक माळी यांना सुद्धा अटक केली. (प्रतिनिधी)