कॉल सेंटरद्वारे २३३ कोटींची फसवणूक
By admin | Published: October 6, 2016 05:48 AM2016-10-06T05:48:13+5:302016-10-06T05:48:13+5:30
तब्बल साडेसहा हजार अमेरिकी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या मीरा रोडमधील बोगस कॉल सेंटरवर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी छापा टाकत ७७२ जणांना ताब्यात घेतले
ठाणे/मीरा रोड : तब्बल साडेसहा हजार अमेरिकी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या मीरा रोडमधील बोगस कॉल सेंटरवर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी छापा टाकत ७७२ जणांना ताब्यात घेतले. त्यापैकी ७० जणांना अटक करण्यात आली. भारतीय महसूल सेवेचे अधिकारी असल्याची बतावणी करून, त्यांनी २३३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
परदेशी नागरिकांना प्रलोभन दाखवत, प्रसंगी धमक्या देत, त्यांच्या गिफ्टकार्ड नंबर मिळवून फसवणूक होत होती. पोलिसांनी उर्वरित ६३० जणांना नोटीस बजावली. या कारवाईत ८५१ हार्ड डिस्क, लॅपटॉप आणि कॉल सेंटरमधील सामग्री असा सुमारे एक कोटींचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली. या कॉलसेंटरमधून दररोज एक ते दीड कोटींची व वर्षाला ४०० कोटींची उलाढाल होत असल्याचे आढळून आले. (प्रतिनिधी)
अशी होत असेल फसवणूक ?
कॉल सेंटरमधून परदेशी नागरिकांना करासंदर्भात
धमकी दिली जाई किंवा वेगवेगळी प्रलोभने दाखविल्यानंतर त्यांना पैसे देण्यास सांगितले जाई. त्यासाठी गिफ्टकार्ड खरेदी करण्यास भाग पाडले जात असे.
नंतर त्या कार्डच्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगून, त्या कार्डचा १६ अंकी क्रमांक विचारला जात असे. तो मिळाल्यावर त्या कार्डद्वारे पैसे वसूल केले जात. यातील २० टक्के रक्कम कमिशनपोटी गिफ्टकार्ड विकणाऱ्याला, तर ८० टक्के रक्कम ही भारतातून फोन करणाऱ्याला मिळायची.
ही रक्कम हवालाद्वारे दिली जायची की बँक खात्यातून पाठवली जायची, याचा तपास करण्यात येत आहे. तपासासाठी कॉल सेंटर्सचालकांची बँक खातीही गोठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हैदरअली मन्सुरी (२४, कॉलसेंटर संचालक), शहीन उर्फ हमजा बालेसार (३५), कबीर गुप्ता (२६), अर्जुन वासुदेव (२४, कॉलसेंटर व्यवस्थापक), अब्दुल्ला झरीवाला (२२), जॉन्सन डॉन्टोसा (२४, कॉलसेंटर व्यवस्थापक), गोविंद ठाकूर (२८), अंकित गुप्ता (१९) यांच्यासह ७० जणांना अटक झाली.
सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद
रानडे आणि ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी रात्री मीरा रोडच्या पेणकरपाड्याचे हरी ओम आयटी पार्क, बाले हाउस, युनिव्हर्सल आउटसोर्सिंग सर्व्हिसेस आणि ओसवाल हाउस येथील सात कॉल सेंटरवर छापे टाकण्यात आले.
40 अधिकारी आणि १२० कर्मचाऱ्यांच्या या कारवाईत ७७२ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यातील ७० जणांना अटक करण्यात आली. ६३० जणांना नोटीस बजावली. ७२ कर्मचाऱ्यांना चौकशीनंतर सोडण्यात आले.