शिरपूर ‘ब’ वर्ग नगरपालिकेचा २४-७ पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2017 09:00 AM2017-06-04T09:00:42+5:302017-06-04T09:00:42+5:30

केंद्र शासनाच्या यूआयडीएसएसएमटी या योजनेंतर्गत शिरपूर नगरपालिकेने नव्याने सुमारे ३० कोटी ७७ लाख रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आणली आहे़.

24-7 water supply of Shirpur 'B' class municipality | शिरपूर ‘ब’ वर्ग नगरपालिकेचा २४-७ पाणीपुरवठा

शिरपूर ‘ब’ वर्ग नगरपालिकेचा २४-७ पाणीपुरवठा

googlenewsNext

सुनील साळुंखे / आॅनलाईन लोकमत
शिरपूर, जि. धुळे, दि. 4 - केंद्र शासनाच्या यूआयडीएसएसएमटी या योजनेंतर्गत शिरपूर नगरपालिकेने नव्याने सुमारे ३० कोटी ७७ लाख रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आणली आहे़. त्यामुळे शहरातील रहिवाशांना आठवड्याचे सातही दिवस अगदी २४ तास मुबलक निर्जंतुक पाणी दिले जात आहे़ एका ‘ब’ वर्ग नगरपालिकेने उत्तम नियोजनाने केलेली ही आदर्श जलक्रांती आहे. या योजनेत शहराच्या फक्त तीन टक्के परिसराचे काम अपूर्ण आहे मात्र तेसुद्धा लवकरच पूर्णत्वाकडे येणार आहे.
विशेष म्हणजे विद्युत पुरवठा कितीही दिवस खंडित झाला, तरी जनरेटरद्वारे पाणीपुरवठा करण्याची सुविधा आहे़ या योजनेमुळे नागरिकांना पाणी साठविण्याची आवश्यकताच नसल्यामुळे डेंग्यूसारखे आजारही उद्भवणार नाहीत, अशी माहिती लोकनियुक्त प्रथम महिला नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आमदार अमरिशभाई पटेल व भूपेशभाई पटेल या पटेल बंधूंनी शहराला ३० वर्षे पुरेल एवढे पिण्याचे पाण्याचे नियोजन केले आहे़ आमदार अमरिशभाई पटेलांनी १९८५ पासून नगरपालिका ताब्यात घेतल्यापासून आतापर्यंत शहराला एकदाही पाण्याची टंचाई भासू दिलेली नाही़ नव्हे तर शहरातील हातपंप काढून प्रत्येकाला नळ कनेक्शन दिले़ त्यामुळे शहरात एकही हातपंप आता दिसत नाहीत़ एवढे जनकल्याणाचे कार्य दूरदृष्टीने करणारी शिरपूर नगरपालिका ही ‘ब’ वर्गातील राज्यात एकमेव आहे़
शहराची लोकसंख्या सुमारे ७७ हजार आहे़ करवंद धरण उद्भव योजनेद्वारे (वाढीव पाणीपुरवठा योजना) शहरातील नागरिकांना दरडोई दरदिवशी सुमारे १४० लिटर्स पाण्याचा पुरवठा केला जात आहे़ सध्या २० लाख लीटर क्षमतेचे ६ तर एक १० लाख लीटर क्षमतेचे असे एकूण ७ जलकुंभ आहेत़ शहरात एकही हातपंप नाही़ त्यामुळे १० हजार नळ कनेक्शनधारक आहेत़ २४ तास योजनेत आतापर्यंत एकूण १३ हजार कुटुंबांकडे मीटरद्वारे पाणी दिले जात आहे.
या योजनेचा शुभारंभ डिसेंबर २०१६ पूर्वीच काही भागात झाला होता, परंतु २०१७ च्या नववर्षाच्या पूर्वसंध्येला जवळपास सर्वच भागात २४ तास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला़ रेडिओ फ्रिक्वेन्सी, थ्री जी, ट्रान्समीटिंग, वॉटर मीटर हे प्रत्येक ग्राहकाच्या घरी लावले गेले आहे़ जेणेकरून आॅटोमेटिक पद्धतीने कोणता ग्राहक किती पाणी वापरतो, ते समजणार आहे़ त्याची विगतवारी न.पा. कार्यालयात असणार आहे़ या सुविधेमुळे जेवढे पाणी वापरणार तेवढे बिल प्राप्त होणार आहे़
धुणीभांडी, शौचालय व इतर सर्वच कामांसाठी या पाण्याचा उपयोग केला जाणार आहे़ २४ बाय ७ योजनेत स्काडा सॉफ्टवेअर वापरल्यामुळे स्वयंचलित पद्धतीने योजना चालविता येणार आहे़ त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळणार आहे़ पाणी व ऊर्जेच्या बचतीबरोबर १०० टक्के पाण्याची वसुली होणार आहे़ शिवाय पंपिंग मशीनरीचे आयुष्यमानदेखील वाढणार आहे़
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या शहराला वीज खंडित झाला, तरी २ वेळा अर्धातास पाणीपुरवठा नियमित केला जात होता़ यासाठी नगरपरिषदेचे विद्युत जनरेटर आहे.
सध्या करवंद धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे़ धरणात मुबलक पाणीसाठा असून जूनपर्यंत पुरेल एवढा साठा असला, तरी तेथील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे़ असे असले तरी त्याशिवाय तापी नदीतील सावळदे जॅकवेल, शहरात तब्बल १७ ट्यूबवेल्स, अरुणावती नदीचा स्त्रोत असे उपलब्ध करून ठेवण्यात आले आहेत़
शहरातील करवंद व निमझरी नाका परिसरातील सर्व नवीन वसाहती, वरवाडे परिसर, मेनरोड, खालचे गाव आदी परिसरात २४ तास पाणी मिळायला सुरुवात झाली़ केवळ पोलीस ठाणे परिसर, वरचे गाव, गणेश कॉलनी, पांडुरंग कॉलनी या परिसरात मीटर लावणे, पाईपलाईनची कामे केली जात आहेत़ लवकरच तेथील कामे पूर्ण केली जाणार आहे़ सध्या ९८ ते ९९ टक्के पाण्याची वसुली असून २४ तास योजनेत १०० टक्के वसुली राहणार आहे़
लवकरच मीटरद्वारे बिल़़-
अद्यापपर्यंत मीटर बिल आकारण्यात आलेले नाही़ कोणता मीटरधारक अधिक पाण्याचा वापर करीत आहे, ते त्यास लक्षात आणून दिले जात आहे़ काही भागात मीटर टेस्टिंग सुरू आहे तर उर्वरित भागातील काम पूर्ण झाल्यानंतर मीटरद्वारे बिल आकारण्यात येणार आहे़
दररोज सव्वाकोटी लीटर पाणी-
शहरातील रहिवाशांना सकाळी व दुपारी असे दोन वेळेस सुमारे ४० मिनिटे पाणी पुरविले जात होते़ दोन्ही वेळेस १ कोटी १० लाख लीटर पाणी दिले जात होते़ यापूर्वी शहरात जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता १२ एमएलटी होती, त्यात पुन्हा तेवढीच वाढ केल्यामुळे एकूण २४ एमएलटी पाणी दररोज शुद्धीकरण केले जात आहे़ २४ तास पाणी दिल्यामुळे ७५ लाख लीटर पाणी द्यावे लागणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत झाली़
कंट्रोल रूम नगरपालिकेत़़़
२४ तास पाण्याचा पुरवठा कसा, किती केला जात आहे हे पाहण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रात कंट्रोल रूम असली, तरी पुन्हा आमदार व नगराध्यक्षांना जागेवरच नगरपालिका कार्यालयात पाहण्यासाठी विशेष कंट्रोल रूम बांधण्यात येत आहे़
यूएसबी रिडरद्वारे मीटर रीडिंग होणार
शहराचे भौगोलिक परिस्थितीनुसार ७ झोन निश्चित करण्यात आले असून ६ झोनमध्ये प्रत्येकी २० लक्ष लीटर क्षमतेच्या जलकुंभाद्वारे व एका झोनमध्ये १० लक्ष लीटर क्षमतेच्या जलकुंभाद्वारे २४ तास पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे़
पाईपलाईन अत्याधुनिक इलेक्ट्रो फ्यूजन तंत्राने जोडल्यामुळे गळतीची शक्यता कमी झाली आहे़ डेन्मार्कमधील कॅमस्ट्रप कंपनीचे ए़एम़आऱ अल्ट्रासोनिक मीटर बसविण्यात आले असून त्यामध्ये मीटर रीडिंग स्वयंचलित पद्धतीने रेडिओ फ्रिक्वेंसीद्वारे घेतली जाणार आहेत़
मीटरमधील रीडिंग घेण्यासाठी कर्मचाऱ्याला घरोघरी जाण्याची आवश्यकता नाही, तो फक्त कॉलनीत एका ठिकाणी थांबेल़ यूएसबी रिडरद्वारे १०० मीटरपर्यंत असलेले सर्व मीटरचे रीडिंग काही मिनिटात घेता येणार आहे़
नळ कनेक्शनसाठी फेरूलचा वापर केल्याने सर्वत्र समान दाबाने पाणी मिळणार आहे़ जी़एस़एम़नेटवर्क प्रणालीद्वारे स्काडा सॉफ्टवेअर वापरून जलशुद्धीकरण केंद्र, रॉ वॉटर पंपिंग स्टेशनचे नियंत्रण एका व्यक्तीद्वारे केले जाणार आहे़
जलशुद्धीकरण केंद्र फक्त एकच इंजिनिअर चालवू शकेल, अशी अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे़ त्यासाठी पाणीपुरवठ्याचे अभियंता सचिन अग्रवाल हे कार्यरत आहेत़
उत्कृष्ट नगरपालिका म्हणून सन्मान-
गेल्या ४ मे रोजी मुंबईत राज्यात उत्कृष्टपणे काम करणाऱ्या नगरपालिकांचा गौरव करण्यात आला़ त्यात राज्यात ‘ब’ वर्गात असलेली शिरपूर-वरवाडे नगरपालिकेलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन्मानचिन्हासह ३ कोटी रुपयांचा धनादेश शिरपूर-वरवाडे नगरपालिकेला देण्यात आला आहे.
सर्वांगीण टेकआॅफ-
शिरपूर शहराचा विकास सिंगापूर पॅटर्नप्रमाणे सुरू आहे़ सिंगापूरच्या धर्तीवरील निर्जंतूक पिण्याचे पाणी, भुयारी गटार योजना, पर्यावरणपूरक वृक्षलागवड, सिमेंटचे अंतर्गत रस्ते़
अद्ययावत असे इंदिरा मेमोरियल हॉस्पिटल-जेथे सर्वप्रकारच्या आजारांचे निदान, औषधोपचार, आवश्यक त्या शस्त्रक्रिया़
चकचकीत असे अ‍ॅम्युझमेंट पार्क, विदेशी खेळणी, आकर्षक तलाव, बोटिंग, लेझर शो, वॉटर पार्क, विविध पाळणे, खाद्य पदार्थांचे स्टॉल, बालगोपाळांसाठी मनोरंजनपर खेऴ
जलसंधारणाचा अभिनव पॅटर्न ज्यात सिमेंट बंधारे, खोल नाले, पाणी साठवणुकीचे अभिनव तंत्र, उत्पादनात झालेली वाढ, लोकांचा वाढलेला राहणीमानाचा दर्जा़
शिरपुरातील उद्योगधंद्यांना अनुकूल वातावरण निर्माण करून देण्याबरोबरच ते पर्यावरणपूरक कसे राहतील, यादृष्टीने परिसरातील सर्व उद्योग हिरवाईने नटले आहेत़
भुयारी गटार योजना प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्रात सर्वप्रथम भुयारी गटार योजना प्रायोगिक तत्त्वावरदेखील याच शहरात होत आहे़. महाराष्ट्रात एकमेव दोन बालाजी मंदिर असलेले हे शहऱ महाराष्ट्रात एकमेव पाण्यावरचा लेझर शो याच शहरात़ भुयारी गटार योजना, पर्यावरणपूरक वृक्षलागवड, सिमेंटचे अंतर्गत रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा व कॉलनी परिसरात एलईडी लाईट व्यवस्था़स्मार्ट सिटीमधील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व माहीत आहे़ सर्व नागरिक त्यादृष्टीने शहर स्वच्छ ठेवतात़ अरुणावती नदीच्या किनाऱ्यावर सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे आहे, असा प्रकल्प उत्तर महाराष्ट्रात एकमेव आहे़
जलसंधारणाच्या कामामुळे या तालुक्याची ओळख राज्यात नव्हे तर देशात़ आशिया खंडातील पहिला गोल्ड रिफायनरी प्रकल्प याच शहरात़ वस्त्रोद्योग नगरी, नाईट लँडिंग करणारे विमानतळ, शैक्षणिक संकुल़
नगरपालिकेचा इतिहास-
देशात इंग्रजांची सत्ता असताना शिरपूर वरवाडे नगरपरिषदेची स्थापना १८ आॅक्टोबर १८६९ साली झाली़ सद्य:स्थितीत पालिकेच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आल्यामुळे संगणकीकृतसह सुसज्ज अशी इमारत दिमाखात उभी आहे़ १४८ वर्षाचा इतिहास या नगरपालिकेला आहे़ सर्वाधिक महसूल असलेली ‘ब’ वर्गातील महाराष्ट्रातील पहिल्या पाच नगरपालिकेत शिरपूर नगरपालिकेचा समावेश आहे़ सतत चार वर्षे राज्याचा स्वच्छता अभियानाचा पुरस्कार घेणारी ही एकमेव नगरपालिका आहे़ गत महिन्यात राज्यात सर्वोकृष्ट न.पा. म्हणून ३ कोटीचा धनादेश देऊन गौरविण्यात आला आहे़
स्मार्ट सिटी योजनेची चर्चा अजूनही सुरू आहे़ प्रशासकीय पातळीवर ही योजना केवळ कागदावर असताना पटेल बंधूंच्या दूरदृष्टीमुळे ही योजना शिरपुरात प्रत्यक्ष साकारली आहे़ स्मार्ट सिटीसाठी असलेले सर्व निकष शिरपूरनगरीने यापूर्वीच पूर्ण केले आहेत़ त्यासाठी शासनाच्या विविध पूरक योजनांचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे ‘ब’ वर्गात असूनही ही नगरी स्मार्ट सिटी बनली आहे़

Web Title: 24-7 water supply of Shirpur 'B' class municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.