सामाजिक न्याय विभागात २४ कोटींचा घोटाळा
By Admin | Published: November 6, 2014 03:28 AM2014-11-06T03:28:13+5:302014-11-06T03:28:13+5:30
शासकीय वसतीगृहांतील विद्यार्थ्यांना संगणक व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षणासाठी मंजूर निधीपैकी २४ कोटींचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन
मुंबई : शासकीय वसतीगृहांतील विद्यार्थ्यांना संगणक व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षणासाठी मंजूर निधीपैकी २४ कोटींचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन खासगी कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कंपन्यांचा शासनासमवेत करार करून देणाऱ्या सामाजिक न्याय विभागातील लोकसेवक व अधिकारीही या प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहाण्याची दाट शक्यता आहे.
बिर्ला श्लोक एज्युकेशन लिमिटेड कंपनीचे विभागीय प्रमुख रवींद्र इंदुलकर, झेनिथ सॉफ्टवेअरचे उपाध्यक्ष गुरुप्रसाद कृष्णमूर्ती, कोअर एज्युकेशन अॅण्ड टेक्नॉलॉजी कंपनीचे उपाध्यक्ष राजू पांडे यांच्याविरोधात एसीबीने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यासह फसवणूक, कट रचणे या कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे.
या सर्वांनी शासकीय अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून जलै २०१२मध्ये शासन निर्णयाचे उल्लंघन केले. वसतीगृहांतील विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी शासनाने दिलेल्या निधीपैकी ७० टक्के निधीचा (२४ कोटी २८ लाख ६९ हजार १५ रुपये) अपहार केल्याचा आरोप एसीबीने ठेवला आहे. या भ्रष्टाचाराबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीवरून एसीबीने चौकशी केली. चौकशीत तथ्य आढळल्याने गुन्हा नोंदविल्याचे एसीबीने स्पष्ट केले आहे.तूर्तास तीन कंपन्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तपासात ज्या कोणाचा सहभाग स्पष्ट होईल त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल असे एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले. (प्रतिनिधी)