मुसळधार कोसळणा-या पावसामुळे राज्यातील २४ धरणे ओव्हर फ्लो, चिंता मिटली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 06:30 AM2017-09-21T06:30:19+5:302017-09-21T06:30:36+5:30
राज्यात दोन दिवसांत पावसाने जोर धरल्याने, ३७ पैकी २४ धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यातून आता पाणी सोडणे सुरू झाले आहे. पुणे विभागातील १८ पैकी १६ धरणांतून पाणी सोडले आहे.
अतुल कुलकर्णी
मुंबई : राज्यात दोन दिवसांत पावसाने जोर धरल्याने, ३७ पैकी २४ धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यातून आता पाणी सोडणे सुरू झाले आहे. पुणे विभागातील १८ पैकी १६ धरणांतून पाणी सोडले आहे. मराठवाड्यातील जायकवाडी आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोयना धरण पूर्णपणे भरत आले आहे. त्यातील जलसाठा कमाल पातळीला पोहोचल्यानंतर धरणांचे दरवाजे उघडावे लागतील, असे जलसंपदामंत्री
गिरीश महाजन यांनी सांगितले. बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून निरा देवघर सांडव्याचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून, ३,६४० व पावरहाउसमधून ७५० असे एकूण ४,३९० क्युसेक्स पाणी नीरा नदीत सोडले जात आहे. वडीवळेमधून १३७, भाटघरमधून २,१६७ आणि मुळशीमधून ७००० क्युसेक्स पाणी सोडले जात असल्याचे ते म्हणाले.
नाशिक जिल्ह्यात पावसाने नदी, नाल्यांना पूर आला आहे. खरिपाच्या पेरण्या शंभर टक्क्यांपेक्षा अधिक झाल्या आहेत. २० सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या ११२ टक्के पाऊस झाला आहे. इगतपुरी, त्र्यंबकला अतिवृष्टीची नोंद झाली. मालेगाव, नांदगाव, कळवण, बागलाण, देवळा हे तालुके कोरडेच आहेत.
>तर जायकवाडीचे दरवाजे उघडणार
जायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक सुरू आहे. वरच्या
सर्व धरणांतून मोठा विसर्ग सुरू असल्यामुळे, धरणात १,९२५.३० दलघमी पाणीसाठा (क्षमता २,१७१ दलघमी) झाला आहे. ते २,१७१ च्या वर गेल्यास दरवाजे उघडावे लागतील. कोयना धरणाने २८०४.८६ दलघमीची पातळी (क्षमता २,८२६ दलघमी) ओलांडल्याने सहा दरवाजे उघडण्यात आल्याचे महाजन म्हणाले.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी विदर्भात जोरदार, कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
>विदर्भात ‘पाणी’बाणी
३३.३८ टक्के पाणीसाठा अमरावती विभागामधील धरणांत जमा आहे. तर ३५.६९ टक्के पाणीसाठा नागपूर विभागामधील धरणांत जमा आहे.