२४ तासांत जोरदार सरींचा अंदाज, पावसाचे पाच बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 06:22 AM2018-06-25T06:22:43+5:302018-06-25T06:23:06+5:30

जोरदार बरसत परतलेल्या पावसाने रविवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पाच जणांचा बळी घेतला

In 24 hours, quite early in the morning, five in the rainy season | २४ तासांत जोरदार सरींचा अंदाज, पावसाचे पाच बळी

२४ तासांत जोरदार सरींचा अंदाज, पावसाचे पाच बळी

googlenewsNext

मुंबई : जोरदार बरसत परतलेल्या पावसाने रविवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पाच जणांचा बळी घेतला. मुंबईत मेट्रो चित्रपटगृहाजवळ झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला. बदलापूरला बॅरेज धरणाखालच्या ओढ्यावर पोहोण्यासाठी उतरलेल्या तरूणाचा; तर नवी मुंबईत खारघरमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला.
मुंबई शहरापेक्षा उपनगरात आणि ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात दिवसभर मुसळधार सरींनी जनजीवन विस्कळीत झाले. उपनगरी गाड्यांची वाहतूक, रस्ते वाहतूक मंदावली. पावसाच्या दमदार सरींमुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. शहर आणि उपनगरांतील सखल भागात पाणी साचले. चेंबूरमध्ये घराच्या छताचा काही भाग कोसळल्याने ज्येष्ठ नागरिक जखमी झाला. पावसाचा जोर आठवडाभर असाच कायम राहणार असून येत्या २४ तासांत जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रविवारी पडलेल्या दमदार पावसामुळे पवई तलाव भरुन वाहू लागला.
दरड कोसळल्यामुळे बंद करण्यात आलेली मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेची एक लेन अद्याप बंद असून दोन लेनवरूनच वाहतूक सुरू आहे. संततधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंड, पनवेलजवळील कर्नाळा खिंडीतील वाहतूक मंदावली होती. महाडजवळ चौपदरीकरणाचे काम पावसामुळे बंद आहे. पण खोदकामामुळे मातीचा भराव रस्त्यावर येत असल्याने दरड कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे वाहनांच्या सुरक्षेसाठी काही धोकादायक वळणावर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.
बदलापूरच्या बॅरेज धरणाच्या ओढ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्याचे नाव गोपाळ दास (वय २०) असून तो मानखुर्द येथे राहणारा आहे. रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली.
खारघरमध्ये तळोजा कारागृहासमोर असलेल्या तलावात फैयान खान (वय १९), रियान खान (वय १९) आणि अबिद सिद्दिकी (वय ३६) यांचा बुडून मृत्यू झाला. तिघेही तळोजा वसाहतीत राहणारे आहेत. पावसाने तलावात पाणी साचल्याने ते पोहण्यास उतरले, पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. पांडवकडा धबधब्यावर प्रवेशबंदी असल्याने अनेकजण आसपासच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात उतरत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. बुडालेल्या तिघांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून अग्नीशमन दलाचे जवान उरलेल्या दोघांचा शोध घेत आहेत.
मुंबई शहर, उपनगरे, ठाणे-पालघर-रायगड जिल्ह्यात रविवारी सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुपारी वरुणराजाने काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर, संध्याकाळी पावसाला जोरदार सुरुवात झाली. दादर, लोअर परळ, माहिम, वांद्रे भागात पावसाचा जोर चांगलाच होता.
पश्चिम उपनगरांत दहिसर, बोरीवली, गोरेगांव, मालाड भागातही पावसाचा जोर चांगलाच होता. वडाळा ते कांजूरमार्ग परिसरातही रविवारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दक्षिण मुंबईतील कुलाबा, फोर्ट परिसरात मात्र पावसाचा जोर दिवसभर काहीसा कमी होता. पावसामुळे मुंबईतील अनेक भागांत ट्रॅफिक जामचे चित्रही दिसत होते. चेंबूरच्या विश्व गौतमनगर वसाहतीतील एका घराच्या छताचा भाग कोसळल्याने शिवाजी कळके हे ज्येष्ठ नागरिक जखमी झाले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
कुलाब्यात रविवारी संध्याकाळपर्यंत १२.०४ मिमी, तर सांताक्रुझमध्ये ८४.०३ मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक असल्याने आणि सुट्टीचा दिवस असल्याने, पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला जास्त प्रमाणात बसला नाही. पण वाहतूक विस्कळीतच होती. रस्त्यावरील वाहतूकही संथ गतीने सरकत होती. पुढचे २४ तास पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास सोमवारी याचा फटका रेल्वे, वाहतुकीला बसण्याची भीती आहे. सलग सुरू असलेल्या पावसाने मुंबईतील पवई तलाव भरून वाहू लागला आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्याने मुंबईत शॉर्टसर्किट आणि झाडे पडण्याच्या किरकोळ घटना घडल्या. शहरात ५, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात ३ अशा नऊ शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली, तसेच शहरात एकूण १७ ठिकाणी झाडे किंवा झाडाच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. मात्र, यातही कोणाला दुखापत झाली नाही. 

Web Title: In 24 hours, quite early in the morning, five in the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.