आमदार नितेश राणेंसह 24 जणांची जामिनावर सुटका

By admin | Published: July 11, 2017 02:34 PM2017-07-11T14:34:52+5:302017-07-11T19:40:43+5:30

कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्यासह 24 जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मत्स्य आयुक्तांविरोधातील मासेफेक आंदोलनप्रकरणी नितेश राणे

24 people, including MLA Nitesh Rane, released on bail | आमदार नितेश राणेंसह 24 जणांची जामिनावर सुटका

आमदार नितेश राणेंसह 24 जणांची जामिनावर सुटका

Next
ऑनलाइन लोकमत
सिंदुधुर्ग, दि. 11 -  कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्यासह 24 जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मत्स्य आयुक्तांविरोधातील मासेफेक आंदोलनप्रकरणी नितेश राणे यांना मालवण पोलिसांनी आज अटक केली होती. त्यानंतर त्यांना कुडाळ सत्र न्यायालयात नितेश राणेंना हजर करण्यात आले. यावेळी नितेश राणे यांच्यासह 24 जणांची प्रत्येकी सात हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. 
येथील मच्छिमारांच्या अनेक प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी मत्स्य कार्यालयात गेले होते. यावेळी राणे त्यांच्यासोबत आलेल्या मच्छिमारांनी थेट आयुक्तांच्या टेबलवर माशांची टोपली ओतली. तसेच, नितेश राणे यांनी  सहाय्यक मत्स्य आयुक्तांवर थेट मासे फेकले होते. दरम्यान, याप्रकरणी मालवण पोलिसांनी नितेश राणे यांच्यावर ही कारवाई केली होती. 
दरम्यान, नितेश राणे यांनी  सहायक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांना बेकायदेशीर पर्ससीननेटच्या मासेमारीवर केव्हा कारवाई करणार? असा सवाल केला. पारंपरिक मच्छिमारांचे जीवनच धोकादायक स्थितीत असताना बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. तसेच १ आॅगस्टपासूनच्या नव्या मत्स्य हंगामात समुद्रात पर्ससीन ट्रॉलर्स दिसून आल्यास ते पेटवून दिले जातील, असा सज्जड दमही नितेश राणे यांनी भरला होता.
(काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना अटक)
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, रापण संघाचे पदाधिकारी दिलीप घारे, श्रमिक मच्छिमार संघाचे छोटू सावजी, नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे रविकिरण तोरसकर, देवगड काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप साटम, अमोल तेली, संभाजी साटम, अमित साटम, सुभाष नार्वेकर, किरण टेंबुलकर, बाळा खडपे, भाई खोबरेकर, तुषार पाळेकर, ज्ञानेश्वर खवळे, सचिन आरेकर, प्रदीप खोबरेकर, गणेश कुबल, गुरुनाथ तारी, अमोल जोशी, संदीप कांदळगावकर, प्रकाश राणे, नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर, नगरसेविका ममता वराडकर, चारुशीला आढाव, चारुशीला आचरेकर, अभय कदम, महेश जावकर, संजय लुडबे, बाळू कोळंबकर, घनश्याम जोशी, कृष्णनाथ तांडेल, राजू बिडये, सूर्यकांत फणसेकर, भाई मांजरेकर आदी उपस्थित होते.

पर्ससीन मासेमारीविरोधात सहायक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांना आमदार नीतेश राणे यांनी चांगलेच फैलावर घेतले. आयुक्त वस्त यांच्याकडून कोणतीच उत्तरे न मिळाल्याने नितेश राणे चांगलेच आक्रमक बनले. त्यांनी अधिकाऱ्यांकडून दाखविला जात असलेला शासन निर्णयच फेकून देत पारंपरिक मच्छिमारांना न्याय मिळवून देण्यासाठी आमच्यावर केसेस दाखल झाल्या तरी त्या घेण्यास मी समर्थ आहे, असे स्पष्ट केले. यावेळी राणे यांनी पारंपरिक मच्छिमारांचे अनेक प्रश्न मांडत अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडले.

आयुक्तांच्या टेबलावर मासळी ओतली...

पर्ससीननेट मासेमारी बंद करण्यासाठी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मच्छिमारांनी मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या टेबलावर बांगडा मासळीची टोपली ओतली. यावर आयुक्त वस्त यांनी ही मासळी पकडण्यास मी सांगितले का? असे वक्तव्य केल्याने संतप्त आमदारांनी टेबलावरील मासळी त्यांच्या अंगावर भिरकावली. मत्स्य विभागाकडून कारवाई होत नसेल तर यापुढे आम्ही आमच्या पद्धतीने कार्यवाही करू,असा इशारा दिला.

लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे...

१ आॅगस्टपासून अनधिकृत पर्ससीन ट्रॉलर्सवर कारवाई केली जाईल. दंडाची रक्कम वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात येईल. अवैधरीत्या मासेमारी करणाऱ्या नौकांचा परवाना रद्द केला जाईल असे लेखी आश्वासन मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांनी दिले. त्यानंतर नितेश राणे यांनी आंदोलन मागे घेतले.

नीतेश राणेंसह शंभरजणांवर गुन्हा...

पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने आक्रमक भूमिका घेत आमदार नितेश राणे यांनी सहायक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांच्यावर बांगडा मासळी फेकल्याप्रकरणी व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याप्रकरणी मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पर्ससीन मच्छिमारांना अभय देत मत्स्य अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप आमदार राणे यांनी करत मत्स्य आयुक्तांवर मासळी फेकली होती. मत्स्य आयुक्तांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार आमदार नीतेश राणे यांच्यासह भाजप मच्छिमार सेलचे रविकिरण तोरसकर, कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, भाई मांजरेकर, छोटू सावजी, दिलीप घारे यांच्यासह शंभर जणांवर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी दिली.

 

Web Title: 24 people, including MLA Nitesh Rane, released on bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.