महाराष्ट्राच्या तीन जवानांसह २४ जणांचा हिमस्खलनात मृत्यू
By admin | Published: January 28, 2017 04:29 AM2017-01-28T04:29:23+5:302017-01-28T04:35:43+5:30
काश्मीरच्या गुरेझ भागात बुधवारपासून सुरू झालेल्या हिमस्खलनात लष्करातील मेजरसह २४ जवानांचा मृत्यू झाला असून, त्यात महाराष्ट्रातील तीन जवानांचा समावेश आहे.
अकोला /बीड : काश्मीरच्या गुरेझ भागात बुधवारपासून सुरू झालेल्या हिमस्खलनात लष्करातील मेजरसह २४ जवानांचा मृत्यू झाला असून, त्यात महाराष्ट्रातील तीन जवानांचा समावेश आहे. त्यापैकी दोघे अकोल्याचे तर एक बीड जिल्ह्यातील आहे.
गुरेझ सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात अकोल्यातील पंचशील नगर भागातील आनंद गवई, मूर्तिजापूर तालुक्यातील माना गावचे संजय खंडारे (२६) आणि बीडचे विकास समुद्रे यांचा मृत्यू झाला. आनंद हे २००९मध्ये सैन्यामध्ये दाखल झाले होते.
आनंद यांच्या कुटुंबात आई-वडील आणि महाराष्ट्र पोलिसांत कार्यरत मोठा भाऊ आहे. दोन आठवड्यांनी सुटीवर आल्यानंतर घरातील मंडळी आनंद यांच्या लग्नाची तयारी करणार होते; मात्र त्यांचा मृत्यू झाला. माना गावचे लष्कारात दाखल झाले होते. त्यांनी २१ जानेवारीपासून सुटी मागितली होती. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे त्यांची सुटी रद्द झाली होती. बुधवारी झालेल्या हिमस्खलनात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वडील सुरेश खंदारे, आई सुलोचना, पत्नी शीतल, आठ महिन्यांचा मुलगा आदर्श, चार वर्षीय मुलगी परी असा परिवार आहे.
बीड जिल्ह्याच्या धारूर येथील विकास पांडुरंग समुद्रे (२७) हे देखील या दुर्घटनेत मरण पावले. त्यांची आई जनाबाई व पत्नी प्रतिभा यांना शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ही बातमी सांगितली नव्हती. विकास हेही २००९ साली सैन्यात भरती झाले होते. त्यांना परमेश्वर नावाचा छोटा भाऊ असून, दोन बहिणी आहेत. त्यांना दिव्या ही नऊ महिन्यांची कन्या आहे. वडील पांडुरंग समुद्रे यांचे दीड वर्षांपूर्वी आजारात निधन झाले.
पुण्यातील एका खासगी कंपनीत चालक असलेल्या परमेश्वर यांना लष्करी अधिकाऱ्यांनी फोनवरून ही माहिती दिली. आईला उच्चरक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांनी ही बातमी घरात कुणालाच सांगितली नाही. दुपारी वृत्तवाहिन्यांवर हे वृत्त झळकल्यानंतर त्यांच्या घराजवळ गावकरी गोळा झाले; मात्र आई आजारी असल्याने ही बातमी घरी न कळविण्याची विनंती परमेश्वर याने सर्वांना केली. वडिलांच्या वर्षश्राद्धासाठी मे २०१६मध्ये विकास गावी आले होता. त्यानंतर त्यांना सुटी मिळाली नाही. १५ दिवसांपूर्वी ते फोनवरून आई, पत्नीशी बोलले होते. (प्रतिनिधी)
हवामान सुधारताच जवानांचे मृतदेह मूळ गावी पाठविण्यात येतील, असे लष्कराने शुक्रवारी सांगितले. मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. हवामान सुधारल्यानंतर ते त्यांच्या गावी रवाना करण्यात येतील, असे लष्करी प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले.
आणखी काही तास धोक्याचे
काश्मीर खोऱ्यातील डोंगरी भागात प्रशासनाने हिमस्खलनाचा इशारा दिला आहे. हिमवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे बनिहाल-रामबन सेक्टरमध्ये अनेक ठिकाणी हिमस्खलन आणि दरडी कोसळल्या. त्यामुळे महामार्ग वाहतूकयोग्य बनविण्याचे काम विस्कळीत झाले आहे. महामार्गावरील दरडी, बर्फ हटवून तो वाहतूकयोग्य बनविण्यासाठी बीआरओची पथके झटत आहेत.