राज्यात स्वाइन फ्लूचे २४० बळी

By admin | Published: June 18, 2017 12:59 AM2017-06-18T00:59:50+5:302017-06-18T00:59:50+5:30

पावसासोबत साथीचे रोग डोकेवर काढत असताना, अजूनही राज्यात स्वाइन फ्लूचाही धोका जाणवत आहे. जानेवारी ते १५ जून २०१७ या अवघ्या सव्वा पाच महिन्यांच्या

240 victims of swine flu in the state | राज्यात स्वाइन फ्लूचे २४० बळी

राज्यात स्वाइन फ्लूचे २४० बळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसासोबत साथीचे रोग डोकेवर काढत असताना, अजूनही राज्यात स्वाइन फ्लूचाही धोका जाणवत आहे. जानेवारी ते १५ जून २०१७ या अवघ्या सव्वा पाच महिन्यांच्या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूचे २४० बळी गेले असून, मुंबईत ७ बळी गेले आहेत, ही माहिती नुकतीच आरोग्य विभागाने दिली. वातावरणात होत असलेल्या बदलामुळे मुंबईकरांमध्ये ताप, लेप्टोस्पायरेसिस व डेंग्यूच्या रुग्णांची संख्येत वाढ होत आहे. विशेष करून मागील वर्षापेक्षा यंदा स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून उघड झाले आहे.
२०१५ मध्ये स्वाइन फ्लूचे ३,०२९ रुग्ण आढळून आले होते. यापैकी ३०हून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता. २०१६मध्ये स्वाइन फ्लूचे केवळ तीनच रुग्ण आढळले होते. २०१७ या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीपासून स्वाइन फ्लूने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. २०१७मध्ये मुंबईत आतापर्यंत १७७ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई शहर-उपनगरातील ई, जी/नॉर्थ, के/ईस्ट, के/वेस्ट, एम/ईस्ट, एस आणि टी या पालिकेच्या विभागात स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत.
जून महिन्यात १ ते १५ या दरम्यान मुंबईत डेंग्यूचे १२८ संशयित रुग्ण आढळले आहेत. या वर्षी मे महिन्यात ४,४१५ तापाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. मागील वर्षी मे महिन्यात तापाच्या ४,१७१ रुग्णांची नोंद झाली होती. मे २०१६ मध्ये लेप्टोचे २ रुग्ण आढळले होते. या वर्षी आजपर्यंत लेप्टोचे ६ रुग्ण आढळले होते. मुंबईत मे महिन्यात ताप, लेप्टो व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असताना, गेस्ट्रो, कावीळ रुग्णांची संख्या कमी झाली आहे, तसेच मागील वर्षी व या वर्षी मे महिन्यात चिकनगुनियाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेली ही आकडेवारी फक्त महापालिकेच्या रुग्णालयात नोंद झालेल्या रुग्णांची आहे. इतर खासगी रुग्णालये व दवाखान्यात या आजारांचे रुग्ण किती याची आकडेवारी या अहवालात नोंद नाही.

काळजी घ्या...
स्वाइन फ्लूचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, ताप व आजाराची अन्य लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, औषधे वेळेवर घ्यावीत, असे आवाहन, मुंबई महापालिकेकडून
करण्यात आले
आहे.

Web Title: 240 victims of swine flu in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.